कोल्हापूर : ‘देखो अपना देश’ योजनेतून स्वदेशी पर्यटनाला उभारी... | पुढारी

कोल्हापूर : ‘देखो अपना देश’ योजनेतून स्वदेशी पर्यटनाला उभारी...

कोल्हापूर, सागर यादव : व्हिड कालावधीत पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला होता. यातून सावरण्याबरोबरच एकूणच पर्यटन विकासासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘देखो अपना देश’ किंवा ‘स्वदेश पर्यटन’ या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

‘देखो अपना देश’ योजनेंतर्गत भारतात प्रवास करण्यासाठी अनेक सवलती व फायदे जाहीर करण्यात आले आहेत. योजनेंतर्गत देशातील 50 पर्यटन केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी संपूर्ण पॅकेज म्हणून विकसित केले जाणार आहेत. राज्यांच्या राजधानीत युनिटी मॉल सुरू करण्यात येणार असून याअंतर्गत एक जिल्हा, एक उत्पादन आणि हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मध्यमवर्गीयांना डोळ्यांसमोर ठेवून ही विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. पर्यटकांना हॉटेलचे दर, प्रवेश शुल्कावर विशेष लाभ मिळणार आहेत. जे कमी प्रवास करतात किंवा लांबचा प्रवास करणे पसंत करतात त्यांना आर्थिक लाभ होईल. योजनेंतर्गत पर्यटकांच्या संवादासाठी एक वेबसाईट व टोल फ्री क्रमांकही असणार आहे.

रोजगार व व्यवसायाच्या मोठ्या संधी

याशिवाय अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांसह पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या खूप मोठ्या संधी असून विशेषतः तरुणांसाठी नोकर्‍या व उद्योजकता विकासासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे. यात सीमा आणि ग्राम पर्यटनासाठी स्वदेश दर्शन योजना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

योजनेद्वारे भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांवर वाहतूक, आर्थिक स्थिती, रोजगार आणि अन्न यासारख्या अत्यावश्यक गोष्टींवर लक्ष दिले जाणार आहे. गंगेच्या काठावर वसलेल्या सर्व पर्यटन स्थळांमध्ये आवश्यकतेनुसार छोटी गेस्ट हाऊस, छोटी झोपडी, उद्याने इत्यादी बांधण्यात येणार आहेत. योजनेंतर्गत निवडलेल्या शहरांतील पर्यटनस्थळांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

सर्वसमावेशक पर्यटन

स्वदेश दर्शन योजनेत सध्या ओळखल्या गेलेल्या सर्किटस्मध्ये बौद्ध तीर्थक्षेत्रे, 5 राज्यांतील 12 स्थळांवरील कृष्ण तीर्थक्षेत्रे, रामायण सर्किट म्हणजेच भगवान रामाशी संबंधित पर्यटन स्थळे, प्राचीन सुफी परंपरा राखणारी पर्यटन स्थळे, जैन तीर्थक्षेत्रे, साईट, आध्यात्मिक सर्किट यांचा समावेश आहे. 7 राज्यांचा समावेश करून पर्यटनाच्या द़ृष्टिकोनातून विकास केला जाणार आहे. याशिवाय नॉर्थ-ईस्ट सर्किट, इको सर्किट, ट्रायबल सर्किट, हेरिटेज सर्किट, वाईल्ड लाईफ सर्किट या संभाव्य पर्यटन स्थळांना चांगल्या सुविधा देऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे.

कोल्हापूर सर्वांगीण परिपूर्ण

स्वदेशी किंवा देखो आपना देश या योजनेसाठी कोल्हापूर सर्वांगीण परिपूर्ण शहर असल्याने याचा रोल मॉडेल म्हणून विकास होऊ शकतो. धार्मिक, सांस्कृतिक, निसर्ग व जलसंप्पन्न, ऐतिहासिक, शैक्षणिक, कृषीपूरक, कला-क्रीडा नगरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. समुद्र आणि बर्फाच्छादित प्रदेश सोडून सर्व गोष्टी कोल्हापुरात उपलब्ध आहेत. गूळ, मिरचीपूड, तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ यासह कोल्हापूरची चप्पल, साज, नथ, फेटा, घोंगडे अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची ही बाजारपेठ आहे. याचा फायदा स्थानिक पर्यटन विकासासाठी आवर्जून होऊ शकतो.

Back to top button