कोल्हापूरात रात्रीत 8 बंगले फोडले; 5.50 लाखांचे दागिने लंपास | पुढारी

कोल्हापूरात रात्रीत 8 बंगले फोडले; 5.50 लाखांचे दागिने लंपास

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सराईत गुन्हेगारीच्या टोळ्यांनी उपनगरांमध्ये शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे दहशत माजविली. लक्षतीर्थ वसाहत आणि आर. के. नगर परिसरात आठ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. तीन बंगल्यातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड अशा साडेपाच लाखांच्या ऐवजांवर चोरट्यानी डल्ला मारला आहे. पाच ठिकाणी चोरट्यांच्या काही लागले नाही. रात्रीत आठ ठिकाणी या घटना घडल्याने परिसरात चिंतेचे सावट आहे.

शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांना टार्गेट करून चोरी, घरफोडीचे गुन्हे करणार्‍या सराईत टोळ्यांचा शिरकाव झाला आहे. आर. के.नगर येथील खडीचा गणपती मंदिर परिसरातील गुलमोहर कॉलनीतील भारती नाईक शनिवारी पहाटे घराला कुलूप लावून मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. अर्ध्या तासात परतल्यानंतर प्रवेशद्वाराचे कुलूप उचकटल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे त्यांना धक्का बसला. घरात जाऊन पाहणी केली असता तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले. चोरट्याने अर्ध्या तासात 15 तोळे दागिने लंपास केले. याचवेळी शेजारच्या जयश्री शिंदे यांच्याही घराचे कुलूप उचकटून सोन्याची नथ, चांदीचा मेखला, चांदीचे कॉईन असा साडेसात हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. परिसरातील आणखी एका घरात चोरीचा प्रयत्न झाला. करवीर पोलिस ठाण्यात या घटनांची नोंद झाली आहे.

लक्षतीर्थ वसाहतीमधील जिव्हाळा कॉलनीतही चोरट्यांनी दोन घरात चोरी केली. तीन ठिकाणी प्रयत्न झाला. मीना पाटील या शुक्रवारी घर बंद करून बाहेरगावी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील लहान अंगठ्या, रोख पाच हजार रुपये आणि चांदीचे दागिने असा सुमारे 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
परिसरात एका घरात आणि चांदी काम करणार्‍या दोन कारखान्यांमध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला; मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Back to top button