कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा 6 फेब्रुवारीपासून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचे निर्देश परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी अधिविभाग प्रमुख व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिले आहेत. तसे परिपत्रक शनिवारी विद्यापीठ परीक्षा विभागाने प्रसिद्ध केले.
महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने 2 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलनाचा निर्णय घेऊन सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयात हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. विद्यापीठाने 2, 3 व 4 फेब्रुवारीच्या रोजीच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या.
आता 6 फेब्रुवारीपासून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतुदीनुसार परीक्षा वेळेत पार पाडण्याची जबाबदारी अधिविभाग प्रमुख, संचालक, प्राचार्य, संचालक यांची आहे. त्यादृष्टीने परीक्षा केंद्रप्रमुख तथा प्राचार्यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी. परीक्षा वेळेत होतील दक्षता घ्यावी. त्यासाठी पर्यायी उपाययोजना आखावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.