मुश्रीफ का गोल्ड कहा है निकालो? | पुढारी

मुश्रीफ का गोल्ड कहा है निकालो?

कोल्हापूर, विकास कांबळे : ईडीच्या अधिकार्‍यांनी जिल्हा बँकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना अतिशय अपमानास्पद वागविले. मुश्रीफ यांच्याशी संबंधित कागदपत्रे दाखविण्याचा आग्रह ईडीचे अधिकारी धरत होते. सेनापती कापशी (ता. कागल) येथील शाखेत तपासणीसाठी गेलेल्या ईडीच्या पथकाने शाखेतील कामाची माहिती घेतली. तेव्हा कर्मचार्‍यांनी सांगितले येथे सोनेतारणवर कर्ज दिले जाते. वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच ईडीचे अधिकारी म्हणाले, ‘मुश्रीफ का गोल्ड कहा है निकालो।’ याची चर्चा आज बँकेत रंगली होती.

कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीने घातलेल्या छाप्यामध्ये कर्मचार्‍यांना दिलेल्या वागणुकीची चर्चा आता बँकेत सुरू झाली आहे. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास बँकेच्या दुसर्‍या मजल्यावरील मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कार्यालयात ईडीच्या अधिकार्‍यांनी प्रवेश केला व आपली ओळख सांगितली. त्यानंतर बँकेच्या कारभाराची चौकशी सुरू झाली. विशेषत: कर्ज विभागातील कागदपत्रांवरच ईडीने आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे या विभागात प्रवेश केल्यानंतर आतून दरवाजे बंद करून बाहेर पोलिस ठेवण्यात आले. सुमारे तीस तास ही तपासणी सुरू होती. या तपासणीत ईडीचे अधिकारी अतिशय वाईट वागल्याचे कर्मचारी सांगू लागले आहेत.

कारवाईच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी ईडीच्या अधिकार्‍यांना जेवणाची सोय करण्याबद्दल विचारले तेव्हा ‘बाद मे देखेंगे’, असे म्हणत त्यांनी तो विषय थांबविला. त्यामुळे बँकेच्या अधिकार्‍यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ईडीच्या एका अधिकार्‍यांने जेवणाबद्दल विचारले. बँकेच्या अधिकार्‍यांनी व्यवस्था केली. रात्री उशिर झाल्यामुळे जेवणाचे पार्सल लवकर आले नाही. त्यामुळे ईडीच्या अधिकार्‍यांनी बँकेच्या कर्मचार्‍यांना अक्षरश: शिव्या दिल्याचे कर्मचारी सांगत आहेत. माहिती मागताना देखील अतिशय उर्मटपणे हे अधिकारी वागत असल्याचे बोलले जाते.

जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह सेनापती कापशी व हरळी या दोन शाखांमध्येही ईडीने छापा टाकला होता. सेनापती कापशी येथील शाखेत ईडीच्या अधिकार्‍यांनी कामकाजाची माहिती घेतली. यावेळी शाखेमध्ये सोनेतारण कर्ज प्रकरणे केली जातात, असे सांगितले. यावर ईडीचे अधिकारी पटक म्हणाले, ‘निकाल… निकाल… मुश्रीफ का गोल्ड कहा है निकालो।’ याचीही बँकेत शुक्रवारी खुमासदारपणे चर्चा सुरू होती.

Back to top button