ज्ञान, भक्ती, कर्म या त्रिसूत्रीच्या आधारे जीवन सर्वांगसुंदर बनवा : श्री श्री रविशंकर | पुढारी

ज्ञान, भक्ती, कर्म या त्रिसूत्रीच्या आधारे जीवन सर्वांगसुंदर बनवा : श्री श्री रविशंकर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आजच्या धकाधकीच्या जीवनात भक्ती मार्गाचा विसर पडत चालला आहे. ज्ञान, भक्ती व कर्म या त्रिसूत्रीच्या आधारे जीवन सर्वांगसुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करा, असा संदेश आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी दिला. तपोवन मैदान येथे आयोजित महासत्संग सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते.

ज्ञानाशिवाय कर्मयोग नाही, असे सांगून श्री श्री रविशंकर म्हणाले, ईश्वराला समर्पित होऊन ध्यानधारणा करावी लागते. यासाठी मन प्रसन्न ठेवा. त्यासाठी भक्ती करा. आज समाजात मानसिक अस्थिरता निर्माण होत चालली आहे. अशावेळी सर्वांशी प्रेमाने वागा. आपल्या सर्वांमध्ये प्रेम आहे, आनंद आहे; पण ते व्यक्त करण्याची कला प्रत्येकाला आली पाहिजे.

जीवन क्षणभंगुर आहे. समस्या अनेक आहेत. सुख आहे, दु:ख आहे; पण प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. अन्य देशांनी जीवनाला संघर्ष मानले आहे; पण भारतीयांनी मात्र जीवन एक खेळ मानला आहे. म्हणूनच भारतीयांच्या चेहर्‍यावर नेहमीच आनंद दिसून येतो. जेव्हा परिस्थिती बिकट होते तेव्हा चेहर्‍यावर आनंद दाखवण्याची गरज आहे.

महाराष्ट्र ही संतांची व शूरवीरांची भूमी आहे, असे सांगून श्री श्री रविशंकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे भवानी देवीचे भक्त होते. त्यांनी आई, वडील, गुरू यांचा सन्मान कसा करायचा हे शिकवले. देशाची संस्कृती निर्माण करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान मोलाचे आहे. वीरता, शूरतेमध्ये भक्ती असेल, तर यश नक्कीच मिळते, हे शिवाजी महाराजांच्या आचरणातून दिसून आले. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांच्या अभंगात महाराष्ट्र आजही तल्लीन होतोे. याच तल्लीनतेने ज्ञानसाधना व योगसाधना केली पाहिजे. ध्यानसाधनेमुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती पाच पटीने वाढते. मन व शरीर प्रसन्न होते.

शरीर कमजोर असले तरी मन कमजोर होऊ देऊ नका. शरीरात काही कमजोरी असली, तरी मनाची कमजोरी निर्माण होऊ न दिल्यास जीवन आनंदाने जगता येते, असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रारंभी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करून कोल्हापूरच्या कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.

तपोवन मैदान भक्तिरसात चिंब

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयोजित भक्ती उत्सवात मंगळवारी तपोवन मैदानावर हजारोंचा जनसमुदाय श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगात भक्तिरसात रमला. यावेळी शेतकरी दाम्पत्याने श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते कोल्हापुरी सेंद्रिय गुळाचे पूजन करून घेतले.

भाविकांना अभिवादन

सायंकाळी सव्वासातच्या सुमारास श्री श्री रविशंकर यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. सुवासिनींनी औक्षण केल्यानंतर भक्तांना अभिवादन करीत भव्य व्यासपीठावर आगमन झाले. व्यासपीठावरील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा यांच्या मूर्तींचे पूजन केले. रॅम्पवरून प्रेक्षकांत जाऊन श्री श्री रविशंकर यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले.

…अन् पसरली नीरव शांतता

श्री श्री रविशंकर यांनी सुमारे 20 मिनिटे ध्यानधारणा करण्यास सांगितले. कार्यक्रमस्थळी हजारोंचा जनसमुदाय होता. मात्र, भक्तांच्या 20 मिनिटांच्या ध्यानस्थ अवस्थेमुळे तपोवन मैदानावर नीरव शांतता पसरली होती.

भक्तजन भजनात दंग

श्री श्री रविशंकर यांच्या आगमनापूर्वी कार्यक्रमस्थळी झालेल्या भजनामध्ये भक्तजन दंग झाले होते. गणेश वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. ‘ओम नम: शिवाय’ या मंत्राचा अखंड गजर करून भजनास सुरुवात झाली. ‘माझे माहेर पंढरी, आहे भीमरेच्या तिरी’, ‘माऊली माऊली आलो मी तुझ्या चरणी’, या गीतांसह अनेक भक्तिगीते सादर करण्यात आली.

मुलांच्या कला

लहान मुलांनी डोळ्यांवर पट्टी बांधून चित्रकला, स्केटिंग सादर केले; तर त्यांनी रंगसंगती आणि चित्रे ओळखून उपस्थितांची वाहवा मिळवली.

कोपेश्वर मंदिर अन् शिवलिंग प्रतिकृतीचे आकर्षण

मैदानावर भव्य व्यासपीठ उभारले होते. 300 फूट भव्य रॅम्पमुळे भक्तांना श्री श्री रविशंकर यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. अनेकांनी त्यांच्या हातात हात देत शुभाशीर्वाद घेतले. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या 18 फुटी शिवलिंग आणि कोपेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधले. 12 ठिकाणी एलईडी स्क्रीनची सोय केली होती.

Back to top button