

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज फिटत नसल्याने महिला हतबल झाली… हप्ते थांबल्याने सावकार दारात येऊ लागले…. पैसे फिटत नसतील, तर तू वेश्या व्यवसाय कर आणि पैसे चुकते कर, असेही त्यांनी धमकावल्याची चर्चा सुरू आहे. राजारामपुरीतील एक दाम्पत्य सावकारांच्या फेर्यात अडकले आहे. या सावकारांनी तर त्यांचे राहते घर, वाहने, उदरनिर्वाहाचा गाडाच काढून घेत त्यांना रस्त्यावर आणले आहे. याबाबतचा अर्ज या पीडित दाम्पत्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना दिला असून, त्याची खातरजमा सुरू आहे.
राजारामपुरीत राहणार्या या दाम्पत्याने खाऊ गल्लीत खाद्यपदार्थ विक्रीसाठी काही सावकारांकडून हातउसने पैसे घेतले होते. कोरोना काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्यांचा व्यवसाय बंद पडला. त्यातच आई-वडिलांचे आजारपण, यामुळे त्यांना आणखीन काही सावकारांपुढे हात पसरावे लागले; पण व्याजाचा फेरा त्यांच्या मागे लागून एकाचे भागवायला दुसर्याकडून घ्यायचे, दुसर्याला भागवायला तिसर्याकडून घ्यायचे, अशा अवस्थेत त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला.
घर, गाडा, दुचाकी सावकारांकडे
व्याज भागवत भागवत या दाम्पत्याने स्वत:चे राहते घर एका सावकाराला दिले. त्यांच्या दुचाकी दुसर्या सावकाराने हिसकावल्या; तर उदरनिर्वाहाचे साधन असणारा खाद्यपदार्थांचा गाडाही सावकारानेच काढून घेतला. बँका, पतसंस्था यांच्याकडून पैसे घेऊनही सावकारांची भूक त्यांना भागवता आली नाही.
पाठीला सॅक… उन्हातान्हात प्रवास
राहते घर सावकाराने बळकावले असून, भाड्याच्या घरात राहणार्या दाम्पत्याच्या दारात दररोज सावकार येतात. या भीतीने दोघांनी आई, वडिलांना नातेवाईकांकडे पाठवले आहे; तर दोन्ही मुलांना सासर्यांकडे, मामाकडे पाठवले आहे. सावकारांच्या भीतीने दोघेही दिवसभर पाठीवर सॅक अडकवून उन्हातान्हात फिरत आहेत.