कोल्हापूर : रोजंदार, ठोक मानधनचे कर्मचारी वार्‍यावर | पुढारी

कोल्हापूर : रोजंदार, ठोक मानधनचे कर्मचारी वार्‍यावर

कोल्हापूर, सतीश सरीकर : आस्थापना खर्च तब्बल 65 ते 70 टक्क्यावर गेल्याने महापालिकेतील सरळ सेवेची भरती 2002 पासून बंद आहे. मात्र नागरिकांना मूलभूत सुविधा तर द्यायलाच पाहिजेत. त्यासाठी पळवाट म्हणून मग रोजंदार आणि ठोक मानधन तत्त्वावर कर्मचारी भरती करण्यात आली. सद्य:स्थितीत 836 कर्मचारी आहेत. कधीतरी नोकरीत कायम होऊ या एकाच आशेने तुटपुंज्या पगारावर 25 ते 30 वर्षे नोकरी करत आहेत. राज्य शासनाला पाठविलेल्या नव्या आकृतिबंधात त्यांच्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. प्रशासन आणि महापालिका कर्मचारी संघाने रोजंदार, ठोक मानधनच्या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले असून नोकरीत पर्मनंट होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे.

महापालिकेचा 4755 कर्मचार्‍यांचा आकृतिबंध मंजूर आहे. प्रत्यक्षात 2800 कार्यरत आहेत. तब्बल 1955 कायम पदे रिक्त आहेत. त्यामुळे 612 रोजंदार कर्मचारी आणि ठोक मानधन तत्त्वावारील 224 कर्मचारी आहेत. रोजंदार कर्मचार्‍यांना रोज 654 रु. हजेरी आहे. महिन्यातील 26 दिवस भरल्यास त्यांच्या हातात 17 हजार पगार पडतो. त्यांना रजा, सुट्ट्या नाहीत. एखादा दिवस सुट्टी घेतली तर त्या दिवसाचा खाडा पडतो. यात बहुतांश झाडू कामगार, पवडी कामगार आहेत.

ठोक मानधन तत्त्वावरील कर्मचार्‍यांना 10 ते 15 हजार मानधन आहे. त्यांना इतर कोणतेही भत्ते नाहीत. यात वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दवाखाने, फायर बि—गेड, पाणीपुरवठा आदी अत्यावश्यक सेवेत ते जीवावर उदार होऊन सेवा बजावत आहेत. 1988 पासून अनेक कर्मचारी रोजंदार म्हणून महापालिकेत पर्मनंटच्या आशेने नोकरी करत आहेत. काहीजण रोजंदार म्हणून रुजू झाले आणि सेवानिवृत्तही झाले. परंतु ते पर्मनंट झाले नाहीत.

कार्यरत असलेले रोजंदार, ठोक मानधनचे कर्मचारी महापालिका कर्मचारी संघाचे सभासद आहेत. नवा आकृतिबंधात कर्मचारी संघाच्या पदाधिकार्‍यांना प्रशासनाने सोबत घेतले होते. पदाधिकार्‍यांनी रोजंदार, ठोक मानधन तत्त्वावरील कर्मचार्‍यांविषयी ठोस भूमिका घेतली नसल्याचे सांगण्यात येते. रोजंदार, ठोक मानधन तत्त्वावरील कर्मचार्‍यांमुळेच अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू आहेत. त्यांच्यासाठी कर्मचारी संघाने प्रशासनाकडे आग्रही भूमिका मांडणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाच्या बाजूनेच कर्मचारी संघाने भूमिका घेतल्याने 836 रोजंदार आणि ठोक मानधन तत्त्वावरील कर्मचार्‍यांचे नोकरीतील भविष्य अंधकारमय झाले आहे.

रोजंदार आणि ठोक मानधनचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून घेतले आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियासुद्धा राबविली आहे. रीतसर जाहिरात देऊन संबंधित कर्मचार्‍यांची शैक्षणिक पात्रता तपासून आणि परीक्षा घेऊनच नोकरीत सामावून घेतले आहे. 1992 पूर्वी महापालिकेत रिक्त जागांवर रोजंदारांना नोकरीत घेतले जात होते. त्यामुळेच महापालिकेत अनेकजण रोजंदार म्हणून रुजू झाले आहेत. रोजंदार आणि ठोक मानधन कर्मचार्‍यांना कायम केल्यास रिक्त पदांचा कोटा कमी होईल. महापालिकेच्या तिजोरीवर त्याचा कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही.

Back to top button