कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचारी 20 फेब्रुवारीपासून संपावर | पुढारी

कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचारी 20 फेब्रुवारीपासून संपावर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  मानधन वाढीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दि. 20 फेब—ुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाची बुधवारी (दि. 1) नोटीस देण्यात येणार आहे.

महागाई दुप्पटीने वाढली; पण मानधनात वाढ नाही, अंगणवाड्यांचे भाडे, आहाराच्या दरात वाढ नाही. सेवासमाप्ती लाभ नाही, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील शासनाने रद्द केल्या. वर्षभरापासून नवीन मोबाईलसाठी आंदोलन करूनही नवीन मोबाईल दिलेला नाही. इंग्रजी भाषेतील सदोष पोषण ट्रॅकर अ‍ॅप लादण्यात आला. उच्च न्यायालयाचे आदेश देखील धाब्यावर बसवले. न्यायालयाचे आदेश झुगारून आपला प्रचंड छळ केला, धमक्या दिल्या. यासंदर्भात आपण वारंवार शासनाकडे दाद मागितली. परंतु, गेल्या चार-पाच वर्षांत आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव हा संप पुकारावा लागत आहे.
दि. 1 फेब—ुवारी रोजी शासनाला संपाची नोटीस देण्यात येईल. त्यानंतर जिल्हा परिषदेवर मोर्चे काढून संपाबाबत निवेदन देण्यात येईल, असे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. पत्रकावर एम. ए. पाटील, दिलीप उटाणे, कमल परूळेकर, भगवानराव देशमुख, जयश्री पाटील आदींच्या सह्या आहेत.

Back to top button