कोल्हापूर : अंबाबाई किरणोस्तव : सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई किरणोस्तव : सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात रविवारी सूर्यकिरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली. किरणोत्सवात अडथळे असल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले. यामुळे आकाशात सूर्य असूनही किरणे मूर्तीच्या खांद्यापर्यंत पोहोचली नाहीत. सोमवारपासून किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल, अशी शक्यता आहे.

अंबाबाईचा किरणोत्सवाचा मूळ सोहळा दि. 30 जानेवारी ते दि. 1 फेब—ुवारीपर्यंत होणार आहे. मात्र, किरणोत्सवापूर्वी आणि नंतरही दोन-तीन दिवस सूर्यकिरणे मूर्तीवर पडत असतात. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मंदिरात किरणोत्सव सोहळा होत आहे. आज सायंकाळी 5.13 वाजता सूर्यकिरणांनी महाद्वार कमानीतून प्रवेश केला. यानंतर 5.25 वाजता किरणे गरूड मंडपात आली. पुढच्या पाच मिनिटांपर्यंत किरणे मंडपाच्या चौथर्‍यापर्यंत पोहोचली.

सायंकाळी सहा वाजता कासव चौकात किरणांचा प्रवेश झाला.यानंतर वेगाने किरणे पुढे सरकत होती.6 वाजून 5 मिनिटांनी किरणांनी पितळी उंबरठा ओलांडला. 6 वाजून 7 मिनिटांनी चांदीचा उंबरठा ओलांडून 6 वाजून 12 मिनिटांनी किरणे कटांगणाजवळ पोहोचली. सायंकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी किरणांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. पुढच्या दोन मिनिटांपर्यंत किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली. सायंकाळी 6.15 ते 6.17 वाजेपर्यंत दोन मिनिटे किरणे मूर्तीवर स्थिरावली होती. यानंतर किरणे मूर्तीच्या डाव्या बाजूने लुप्त झाली.
मंदिरात 70 ते 72 लक्ष इतकी आर्द्रता आवश्यक असते. आज ती 27 ते 28 लक्ष इतकीच होती. हवेतील धुक्याची लहर तसेच काही काळ आलेली काळ्या ढगाची झालर यामुळे किरणे विखुरली. गेल्या दोन दिवसांतील किरणांची प्रखरता आणि प्रवास पाहता आज ती मूर्तीच्या खांद्यापर्यंत जातील अशी शक्यता होती, असे अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले.

सूर्यकिरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत आली, तेव्हा किरणोत्सवात अडथळा असल्याचे स्पष्ट झाले. एका इमारतीच्या गॅलरीसह अन्य अडथळ्यामागे सूर्य गेल्याने किरणे पुढे सरकली नाहीत. अद्यापही किरणोत्सव मार्गातील अडथळे कायम आहेत, ती काढावीत यासाठी महापालिकेला कळवण्यात आले आहे. याबाबत भरपाई देण्यासही देवस्थान तयार आहे. मात्र, याबाबत कार्यवाही होत नसल्याचे देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले. यावेळी अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, सहाय्यक व्यवस्थापक गणेश नेर्लीकर, अभ्यासक विद्यार्थी ऋषी डोंगरे व मानसी पाटील उपस्थित होते.

Back to top button