कोल्हापूर : सादळे-मादळे घाटात ट्रॅक्टर उलटला; चालक ठार

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा : सादळे-मादळे (ता. करवीर) येथील सादळे घाटात जुन्या जेनिसीअस कॉलेजजवळ धोकादायक यु आकाराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. आज (दि. २९) दुपारी १ च्या सुमारास झालेल्या या अपघातात कुमार चौगुले (वय ३०) या चालकाचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, हंबीरराव सुतार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर मादळेहून टोपला सेंट्रींग कामाचे साहित्य घेऊन जात होता. यावेळी कासारवाडी हद्दीत जुन्या जेनिसिअस कॉलेजजवळ दुसऱ्या वळणावर खाली येताना चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने पलटी झाला. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाला कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाला.
या वळणाशेजारी जुन्या जिनिसेअस कॉलेजच्या कंपाउंडचे काम चालू आहे. यामुळे तेथे चार मजूर काम करत होते. ऊन आहे म्हणून दुपारी पाणी पिण्यासाठी कामगार काही क्षणासाठी बाजूला गेले. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
या वळणाभोवती संरक्षित कठडे नसल्याने हे वळण धोकादायक झाले आहे. या वळणावर संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक, मिनी व्हायब्रेटर असावेत यासाठी ‘दै पुढारी’ तून वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी नागरिकांत सुरू होती.
हेही वाचलंत का ?
- कोल्हापूर : फुटबॉल सामन्यावेळी हाणामारी; लाठीमार
- Shelke Complex | कोल्हापूर : बांबवडेत ‘शेळके’ कॉम्प्लेक्स उभारणाऱ्या बिल्डरांमध्ये वादाची ठिणगी; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ
- कोल्हापूर : शेतकर्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण; राज गँगवर गुन्हा दाखल