कोल्हापूर-पुणे मार्गावर ‘ब्रॉडगेज मेट्रो’ देऊ : नितीन गडकरी | पुढारी

कोल्हापूर-पुणे मार्गावर ‘ब्रॉडगेज मेट्रो’ देऊ : नितीन गडकरी

कोल्हापूर, अनिल देशमुख : कोल्हापूर-पुणे मार्गावर ‘ब्रॉडगेज मेट्रो’ धावणे शक्य असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला तर लवकरच मेट्रो धावेल, असा विश्वासही त्यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.

रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कामांबाबत गडकरी आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची शनिवारी कोल्हापूर विमानतळावर बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना गडकरी यांनी ‘ब्रॉडगेज मेट्रो’ ही संकल्पना नागपूरमध्ये राबविण्यात येत आहे, त्याच पद्धतीने ती कोल्हापूर-पुणे मार्गावरही शक्य असल्याचे सांगितले.

कोल्हापूर-पुणे आणि कोल्हापूर-अहमदनगर या मार्गांवरही अशाच प्रकारे ‘ब्रॉडगेज मेट्रो’ सुरू करता येईल, त्याद़ृष्टीने प्रयत्न करावा, अशी सूचना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गडकरी यांनी राज्यातील रस्ते विकासविषयक बैठकीत केली होती. ‘ब्रॉडगेज मेट्रो’ हा प्रकल्प कमी खर्चात होणारा आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ट्रॅकचाच वापर करून ही मेट्रो चालवता येते.

सध्या कोल्हापूर-पुणे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. भविष्यात कोल्हापूर-मिरज मार्गाचेही दुहेरीकरण शक्य आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर-पुणे मार्गावर ‘ब्रॉडगेज मेट्रो’च्या निमित्ताने कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांनाही विकासाची मोठी संधी मिळणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर गडकरी म्हणाले, ‘ब्रॉडगेज मेट्रो’ ही संकल्पना विकासाच्या द़ृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर ती शक्य आहे. मात्र, याकरिता पाठपुरावा करावा लागेल. स्थानिक लोकप्रतिनिधींनी तो केला, तर ‘ब्रॉडगेज मेट्रो’ कोल्हापुरातून धावू शकेल. खा. धनंजय महाडिक चांगला पाठपुरावा करतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अनेक वर्षे रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाबाबतची सद्यस्थिती आपल्याला माहीत नसल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

Back to top button