चकोते बेकरीमुळे कोल्हापुरी चव जगभरात पोहोचणार : नितीन गडकरी

चकोते बेकरीमुळे कोल्हापुरी चव जगभरात पोहोचणार : नितीन गडकरी

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : गणेश बेकरीचे उद्योजक अण्णासाहेब चकोते यांनी गुणवत्तेचे ब्रँड निर्माण केले आहेत. परदेशातून मशिनरी आणून भागाचा विकास त्यांनी केला आहे. त्यांच्या उद्योगातून हजारो जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. चकोते ग्रुपने उभारलेल्या या प्रकल्पामुळे फक्त कोल्हापूरच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे कोल्हापुरी चव जगभरात चाखायला मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नांदणी (ता. शिरोळ) येथील चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या अद्ययावत प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. यावेळी मंत्री गडकरी बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मंत्री गडकरी म्हणाले, नांदणीसारख्या ग्रामीण भागातून बेकरी उद्योगातून चकोते यांनी लौकिक मिळवला आहे. बेकरी व्यवसायात ब्रँड बनविणे खूप कठीण आहे. एकविसाव्या शतकात गुणवत्ता आणि विश्वसनीयता याचा भांडवल म्हणून उपयोग झाला पाहिजे. पैसा आणि टेक्नॉलॉजी मिळूनदेखील शॉर्टकटने मिळवलेले यश फार काळ टिकत नाही. ब्रँडिंगसाठी खूप वर्षे परिश्रम घ्यावे लागतात. चकोते यांनी नम्रतेने व्यवसायात यश मिळवले आहे.

सामाजिक कार्यातदेखील त्यांचे योगदान आहे. गुणवत्ता, पॅकिंग, मार्केटिंग हे व्यवसायात महत्त्वाचे ठरते. अभ्यासापेक्षा अनुभवाचे विचारधन खूपच महत्त्वाचे आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता

बेकरी उद्योगातील त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे. व्यावसायिक द़ृष्टिकोनातून त्यांनी तयार केलेला ब्रँड देश-परदेशातही लौकिकपात्र ठरेल. मराठी माणसाला पुढे न्यायचे असेल, तर उद्योग आणि व्यवसायाच्या क्षेत्रात आणखीन गती वाढणे गरजेचे आहे. तरुणांनी नोकरी मागणारे नको, तर नोकरी देणारे होणे अपेक्षित आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, चकोते ग्रुपच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. दुष्काळ, महापूर, कोरोनासारख्या काळातदेखील चकोते यांचे कार्य अद्वितीय आहे. नांदणी हे भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे. मात्र, नांदणीची ओळख भाजीपाल्याबरोबरच गणेश बेकरी म्हणूनही जगभर पोहोचली आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीही चकोते यांच्या कार्याचे कौतुक केले.

चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन अण्णासाहेब चकोते म्हणाले, चकोते ग्रुपच्या माध्यमातून पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उत्पादने ग्राहकांना देत असताना त्यांची गुणवत्ता जपली आहे. जपान, जर्मनी आदी देशांतून प्रकल्प या ठिकाणी आणले आहेत. या ठिकाणी दीडशे उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. आता भारताची बाजारपेठ काबीज करण्यासाठी चकोते ग्रुप सज्ज आहे. लवकरच उत्पादने निर्यात होतील आणि तो क्षण उद्योग समूहासाठी सुवर्णक्षण असेल, असे सांगत उद्योग समूहाच्या यशामागील अनेक रहस्ये त्यांनी उलगडली.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजयकाका पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, ललित गांधी, गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, मकरंद देशपांडे, बाबा देसाई, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, सरपंच संगीता तगारे, राजवर्धन नाईक-निंबाळकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news