कोल्हापूर : शेतकर्‍याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण; राज गँगवर गुन्हा दाखल | पुढारी

कोल्हापूर : शेतकर्‍याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण; राज गँगवर गुन्हा दाखल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : किणी (ता. हातकणंगले) येथील धरणग्रस्त पुनर्वसन प्रकल्पात संपादित शेतजमीन बळकाविण्यासाठी धरणग्रस्त शेतकर्‍याला दोरीने हात बांधून बेदम मारहाण करून शेतात ट्रॅक्टर नांगर फिरवून ऊस पिकाचे नुकसान केल्याची घटना नुकतीच घडली.

याप्रकरणी राज गँगचा म्होरक्या राजवर्धन ऊर्फ राज बाबासाहेब पाटील आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध राजाराम पाटील (वय 48, रा. चांदोली वसाहत, किणी, ता. हातकणंगले) यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान संशयित राजवर्धन ऊर्फ राज पाटील, राकेश नवनाथ हाके, शामराव पाटील (रा. वडगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

कारावाईनंतर संशयिताच्या समर्थकांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती. फिर्यादी राजाराम पाटील यांच्या ताब्यातील जमीन जबरदस्तीने काढून घेण्यासाठी मूळ मालक शामराव पाटील व संभाजी पाटील यांनी राज गँगला सुपारी दिली होती. फिर्यादीला धमकी, शिवीगाळ करून शेतात जाण्यापासून रोखण्यात आले होते. दि. 16 जानेवारीला फिर्यादीसह त्याच्या नातेवाईकांना मारहाण करण्यात आली. राकेश हाके याने फिर्यादीला जबरदस्तीने मोटारसायकलीवरून नेऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दि. 24 जानेवारीला रात्रीच्यावेळी 15 ते 17 जणांनी शेतात जबरदस्तीने घुसून दीड महिन्याचे उसाचे पीक नांगरून नुकसान केले होते. यावेळी विरोध करणार्‍यांना हाताला दोरी बांधून धमकावले. राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये राजवर्धन पाटील, राकेश हाके, शामराव पाटील, संभाजी पाटील, अतीश पाटीलसह गँगमधील 25 ते 30 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक भीमगोंडा पाटील अधिक तपास करत आहेत.

Back to top button