कोल्हापूर जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापूर मध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, मोर्चे काढण्यात आले.

संयुक्‍त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात बंदचे आवाहन केले होते. बंदनिमित्त बिंदू चौकामध्ये सभा घेण्यात आली. या सभेत आजच्या बंदने केंद्र सरकारविरोधात व्यापकलढाई सुरू झाली असल्याचा इशारा देण्यात आला. बंद यशस्वी झाल्याचा दावा संयुक्‍त शेतकरी कामगार मोर्चाने केला.

दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत ‘एक दिवस शेतकर्‍याला’ अशी साद घालत व्यापार्‍यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे काही काळ दुकाने बंद राहिली.

संयुक्‍त शेतकरी कामगार मोर्चाने कोल्हापुरात बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सर्व कार्यकर्त्यांना बिंदू चौकामध्ये जमण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कार्यकर्ते सकाळपासून जमत होते. या ठिकाणी केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
लाड चौकातून रॅली

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत काँग्रेसचे कार्यकर्ते लाड चौकात जमले. या ठिकाणी कार्यकर्त्यांना गटागटाने विविध मार्गांवरून फिरून बंदचे आवाहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रॅलीत अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. रॅली झाल्यानंतर बिंदू चौकामध्ये जमावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, सूर्यकांत पाटील-बुधिहाळकर, सुलोचना नाईकवाडे, माजी नगरसेवक अर्जुन माने, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, दुर्वास कदम, संजय मोहिते, राहुल माने आदी उपस्थित होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांचे पाच गट तयार करून त्यांना विविध मार्ग देण्यात आले. त्यांनी रंकाळावेस, गंगावेस, पापाची तिकटी, महाद्वार रोड, गुजरी कॉर्नर, भाऊसिंगजी रोड, उमा टॉकिज, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी या मार्गांवरून फिरत व्यापार्‍यांना बंदचे आवाहन केले. त्यामुळे रॅलीच्या मार्गावरील दुकाने काही काळ बंद राहिली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सर्व फेरीवाल्यांनी आपले व्यवसाय सायंकाळपर्यंत बंद ठेवले होते. त्यामुळे दुपारी या परिसरात शांतता होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचाही सहभाग

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळी महाराणा प्रताप चौकात जमले. येथून बिंदू चौकापर्यंत त्यांनी मोटारसायकल रॅली काढली. यामध्ये पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, निरंजन कदम, सुनील देसाई, रियाज कागदी, महादेव पाटील, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, सुमन वाडेकर, फिरोज सौदागर आदींसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Back to top button