कोल्हापूर : दादर-पंढरपूर एक्स्प्रेसचा कोल्हापूरपर्यंत विस्तार शक्य | पुढारी

कोल्हापूर : दादर-पंढरपूर एक्स्प्रेसचा कोल्हापूरपर्यंत विस्तार शक्य

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  धावणारी दादर-पंढरपूर एक्स्प्रेस कोल्हापूरपर्यंत विस्तारित करणे शक्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न झाला, पाठपुरावा केला तर कोल्हापूर-मुंबई मार्गावर आणखी एक एक्स्प्रेस गाडी उपलब्ध होणार आहे. मुंबईहून ही गाडी (क्रमांक 11027) दर रविवार, सोमवार आणि शुक्रवारी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी सुटते. ती पंढरपूरमध्ये सकाळी साडेआठ वाजता पोहोचते. पंढरपूरहून ही गाडी (क्रमांक 11028) दर सोमवार, मंगळवार आणि शनिवारी रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी सुटून दादरला दुसर्‍या दिवशी पहाटे 6 वाजून 35 मिनिटांनी पोहोचते.

कोल्हापूर ते पंढरपूर हे रेल्वेमार्गे अंतर 184 कि.मी.चे आहे. त्याकरिता तीन तास लागतात. यामुळे दादर ते पंढरपूर ही गाडी कोल्हापूरपर्यंत विस्तारित केल्यास ती सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत कोल्हापुरात पोहोचू शकते. सायंकाळी सहा वाजता कोल्हापुरातून सुटल्यास रात्री नऊ वाजता पंढरपूरमध्ये पोहोचून ही गाडी पुढे नियोजित वेळेनुसार मुंबईपर्यंत धावणे शक्य आहे. सकाळी 8.30 ते रात्री 9 अशी सुमारे 12 तास पंढरपुरात थांबून राहते. या कालावधीत ही गाडी कोल्हापूरपर्यंत येऊन परत पंढरपूरपर्यंत धावू शकते. कोल्हापुरात ही गाडी सुमारे 6 तास थांबेल. या कालावधीत पीटलाईनवर गाडी घेऊन स्वच्छता, पाणी भरणे आदी सर्व कामे करता येणे शक्य आहे. मुंबईतून सुटणारी वेळ अर्धा-एक तास अगोदर आणली तरी आणखी वेळ मिळू शकतो.

दादर-पंढरपूर कोल्हापूरपर्यंत विस्तारित झाल्यास पंढरपूर-कोल्हापूर मार्गावर आणखी एक एक्स्प्रेस उपलब्ध होईल. यामुळे दोन तीर्थक्षेत्रे जोडली जातील. या मार्गावरील प्रवाशांचा ताण कमी होण्यास मदत होईल. या सर्व पार्श्वभूमीवर ही गाडी कोल्हापूरपर्यंत विस्तारित करणे शक्य आहे. मात्र त्याकरिता सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

केवळ अडीच तास जादा वेळ लागणार

ही गाडी कोल्हापूरपर्यंत विस्तारित केल्यास कोल्हापूर-मुंबई या मार्गावरील प्रवासासाठी केवळ अडीच तास जादा वेळ लागणार आहे. सायंकाळी गाडी कोल्हापुरातून सुटणार असली तरी ती मुंबईत सकाळी पोहोचणार असल्याने त्याला प्रवाशांची पसंती मिळेल अशी शक्यता आहे.

कोल्हापूर-मुंबई प्रवास

एक्स्प्रेसचे नाव अंतर (कि.मी.) लागणार वेळ
कोयना एक्स्प्रेस 518 12 तास 30 मिनिटे
महालक्ष्मी एक्स्प्रेस 518 10 तास 30 मिनिटे
दादर-पंढरपूर-कोल्हापूर 604 12 तास 30 मिनिटे

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सह्याद्री एक्स्प्रेस बंदच केली आहे. ती तत्काळ सुरू करावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याबरोबरच दादर-पंढरपूर कोल्हापूरपर्यंत विस्तारित करण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल. या गाडीमुळे कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल. महालक्ष्मी एक्स्प्रेसला दररोज 100 हून अधिक वेटिंग असते. यामुळे मुंबईसाठी जाणार्‍या प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध होईल.
– शिवनाथ बियाणी, सदस्य, मध्य रेल्वे सल्लागार समिती

Back to top button