राज्यव्यापी दुधाचा एक ब्रँड करावा : पृथ्वीराज चव्हाण

राज्यव्यापी दुधाचा एक ब्रँड करावा : पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दूध व्यवसायामध्ये काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी शासनाच्या मदतीने महाराष्ट्राचा एक राज्यव्यापी दुधाचा ब्रँड तयार करावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. दुधाचा व्यवसाय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला तारणारा असल्यामुळे या व्यवसायामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपपदार्थ तयार करण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.

पशुसंवर्धन व डेअरी उद्योगाच्या वतीने आयोजित केलेल्या दूध परिषदेचा समारोप शुक्रवारी सायंकाळी झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून चव्हाण बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. हॉटेल सयाजी येथे ही परिषद झाली. याला राज्यभरातील दूध व्यवसायातील प्रतिनिधी उपस्थित होते.

दूध व्यवसायामुळे रोज चलन मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी आहे. भारत जगात सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश आहे; परंतु उपपदार्थांमध्ये जागतिक बाजारपेठेत भारताची निर्यात एक टक्काही नाही. दूध व्यवसायामध्ये प्रचंड संधी आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना योग्य मार्गदर्शन, अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व सुविधा उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला तारणारा हा व्यवसाय ठरेल.

धवल क्रांती यशस्वी करण्यात गोकुळचे योगदान मोठे आहे. दूध व्यवसाय अत्याधुनिकपणे करून नवनवीन उत्पादने घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डेअरी व्यवसायाचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणविरहीत सर्वपक्षीय चळवळ उभारण्याचा प्रयत्न करू, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

इंडियन डेअरी फेस्टिव्हलचे उद्घाटन आ. सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी संचालक अरुण नरके होते. याप्रसंगी चितळे डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चितळे, कात्रज दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, वारणा दूध संघाचे एच. आर. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सतेज पाटील म्हणाले, देशात जोडधंदा म्हणून समजला जाणारा दुग्ध व्यवसाय अनेकांचा प्रमुख व्यवसाय बनला आहे. मात्र, आजही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे जाणवते. हा व्यवसाय स्थिर बनविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी पारंपरिकतेसोबतच तंत्रज्ञानाची मदत घेऊन यापुढे दुग्ध व्यवसाय केल्यास आपला टिकाव लागे, असे मत आमदार सतेज पाटील यांनी मांडले.

यावेळी आ. पी. एन. पाटील, महानंदाचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख आदी उपस्थित होते. आभार अरुण नरके यांनी मानले.

यापुढे दरवर्षी दूध परिषद

पहिल्या दूध परिषदेस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारची दूध परिषद भरविण्यात येईल, असे डॉ. चेतन नरके यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news