कोल्हापूर : ‘ती’ महाविद्यालयीन विद्यार्थिनी बनून मारायची महिलांच्या पर्सवर डल्ला | पुढारी

कोल्हापूर : ‘ती’ महाविद्यालयीन विद्यार्थिनी बनून मारायची महिलांच्या पर्सवर डल्ला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  पाठीवर सॅक… पंजाबी ड्रेस… महाविद्यालयात निघाल्याचा बनाव करत महिलांच्या पर्स लंपास करणार्‍या अट्टल चोरट्या तरुणीला लक्ष्मीपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीत तिने शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सहा चोर्‍या केल्याचे उघड झाले.

प्रज्ञा ऊर्फ प्रतीक्षा दगडू निंबाळकर (वय 22, रा. बोरिवडे, पन्हाळा) असे तिचे नाव आहे. एक तोळे दागिन्याासह 88 हजारांची रोकड तिच्याकडून जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संशयित प्रज्ञा निंबाळकर हिचे आई-वडील मुंबईत राहतात, तर गेल्या वर्षापासून ती कोल्हापुरातील बोंद्रेनगरात राहते. तिने शहरातील एका महाविद्यालयात एफवायबीएच्या वर्गात अ‍ॅडमिशनही घेतले होते. महाविद्यालयाचे आयकार्ड अडकवून ती शहरात फिरत होती.

गर्दीचा फायदा घेत चोर्‍या

छत्रपती शिवाजी चौक, लुगडी ओळ, बाजारगेट, गंगावेश अशा गर्दीच्या ठिकाणी शिरून ती महिलांच्या पर्स लंपास करीत होती.

माळकर तिकटी परिसरात पकडले

मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी चौकातून एका तरुणीची पर्स चोरीस गेली. तिला एका तरुणीवर संशय होता. त्या तरुणीने तत्काळ लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात येऊन संशयित तरुणीचे वर्णन सांगितले. यावरून लक्ष्मीपुरीच्या डी. बी. पथकाने काही वेळातच तिला पकडले.

पोलिस पथकाचे कौतुक

संशयित प्रज्ञा निंबाळकर हिने सहा ठिकाणी केलेल्या चोर्‍यांची कबुली दिली आहे. तिच्याकडून 9 ग्रॅम वजनाचा सोन्याचा जिन्नस, रोख 88 हजार 950 रुपये असा सुमारे सव्वा लाखांचा ऐवज जप्त केला. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिस पथकाचे कौतुक करत रोख पारितोषिक जाहीर केले.

Back to top button