कोल्हापूर : जलसंपदा विभागाची 76 कोटी पाणीपट्टी थकीत | पुढारी

कोल्हापूर : जलसंपदा विभागाची 76 कोटी पाणीपट्टी थकीत

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका पंचगंगा आणि भोगावती या नद्यांतून उपसा करते. त्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार जलसंपदा विभागाला पाणीपट्टी भरावी लागते; परंतु गेली अनेक वर्षे महापालिकेने संपूर्ण पाणीपट्टी भरलेली नाही. परिणामी जलसंपदा विभागाचे देणे तब्बल 76 कोटीरुपयांवर गेले आहे. मग महापालिका प्रशासन कोल्हापूरवासीयांकडून वसूल करत असलेली कोट्यवधींची रक्कम जाते कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोल्हापूरला रोज सुमारे 140 ते 150 एम.एल.डी. पाणीपुरवठा केला जातो. पंचगंगा नदीतून शिंगणापूर उपसा केंद्र आणि भोगावती नदीतून बालिंगा व नागदेवावाडी उपसा केंद्रांद्वारे पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीतील कच्चे पाणी फिल्टर हाऊसमध्ये नेऊन त्याठिकाणी त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते शहरवासीयांना पुरविण्यात येते; परंतु नदीतील पाणी घेण्यासाठी महापालिका राज्य शासनाला पाणीपट्टी भरते. त्याचे महिन्याला बिलिंग होते.

पाणीपट्टी दराबाबत वाद

पंचगंगा व भोगावती नदीतील पाण्याच्या दरावरून जलसंपदा विभाग व महापालिका यांच्यात गेली अनेक वर्षे वाद सुरू आहे. महापालिकेला सध्या पाण्यासाठी घरगुती – 1.20 रुपये (प्रती हजार लिटर) व औद्योगिक – 23.92 रुपये असा दर आहे. त्यापोटी महापालिकेकडून वर्षाला सुमारे 2 ते 3 कोटी रुपये भरले जात आहेत; परंतु पाणीपट्टीची रक्कम जास्त असल्याने उर्वरित रक्कम जलसंपदा विभागाकडून थकबाकी म्हणूनच नोंद करण्यात येत आहे.

महापालिकेच्या वतीने शहरवासीयांना घरगुती 0 ते 20 हजार लिटरपर्यंत 9.50 रुपये (प्रती हजार लिटर), 20 ते 40 हजार लिटरपर्यंत 12.65 रुपये (प्रती हजार लिटर) आणि 40 हजार लिटरच्या पुढे 18 रुपये (प्रती हजार लिटर) असा पाण्याचा दर आकारण्यात येत आहे. त्याबरोबरच व्यापारी नळ कनेक्शनधारकांना 46 रुपये प्रती हजार लिटर आणि औद्योगिकसाठी 74.75 रुपये प्रती हजार लिटर पाणीपट्टी आकारली जात आहे.

महापालिकेकडे पाणी बिलातून वर्षाला सुमारे 60 कोटी रुपये जमा होतात. त्याबरोबरच वर्षाला सुमारे 11 ते 12 कोटी रुपये सांडपाणी अधिभार जमा होतो. महापालिका प्रशासन पाण्याची गळती काढण्याकडे लक्ष देत नसल्याने एकूण पाणी उपशापैकी 40 ते 45 टक्के पाणी गळतीतून वाया जात आहे.

एकूण थकबाकी
76,89,19,015
पाणी पट्‌टी
34,28,53,705
दंडाची रक्‍कम
21,68,68,256
विलंब शुल्‍क
12,21,83,609

Back to top button