कोल्हापूर : पन्हाळा उड्डाणपूल प्रस्ताव धूळखात | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळा उड्डाणपूल प्रस्ताव धूळखात

कोल्हापूर, सुनील सकटे : रस्ता वारंवार खचत असल्याने पन्हाळगडाचे प्रवेशद्वारच बंद होत आहे. त्यामुळे तेथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव गेले वर्षभर धूळखात पडून आहे. या प्रस्तावावरील धूळ कोण झटकणार की, पुन्हा रस्ता बंद झाल्यानंतरच सरकारला जाग येणार? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. पन्हाळा येथे किल्ला असल्याने तेथे विशेष बाब म्हणून नागरी वस्तीला सुविधा पुरविण्यासाठी गिरिस्थान नगरपालिकेची विशेष बाब म्हणून स्थापना केली आहे. त्यामुळे लोकांची काळजी घेणे याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे.

पन्हाळा हे ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. 23 जुलै 2021 रोजी पावसाने पन्हाळगडावरील मुख्य रस्ता खचला होता. त्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाने उड्डाणपुलाचे नियोजन केले आहे. उड्डाणपुलाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिझाईन सर्कल कार्यालयाकडे वर्षभरापासून प्रलंबित आहे. या प्रस्तावाबाबत केवळ चर्चा सुरू असल्या तरी पुढील हालचाली मात्र मंदावल्याचे चित्र आहे.

पन्हाळा रस्ता खचल्याने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उड्डाणपुलाचा प्रस्ताव समोर आला. यासाठी सार्वजनिक बांंधकाम विभागाने सर्वेक्षण करून सविस्तर प्रस्ताव पाठविला आहे. तसेच उड्डाणपुलासाठी आवश्यक भूसंपादनासाठी वन विभाग आणि पुरातत्त्व खात्याशी सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रव्यवहार केला आहे. विशेष प्रकल्प विभागाने स्थानिक पातळीवर प्रयत्न केले असले तरी वरिष्ठ कार्यालयातून गतीने काम पुढे सरकण्याची गरज आहे.

या उड्डाणपुलासाठी सुमारे 65 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बुधवार पेठ ते पन्हाळा नगरपरिषद, टोल प्लाझा या ठिकाणी एक किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. यापैकी केवळ 500 मीटर अंतर वन विभाग व पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येते. या प्रस्तावात काही तांत्रिक त्रुटी असल्यास त्या दुरुस्तीच्या सूचनाही अद्याप डिझाईन सर्कलकडून मिळाल्या नसल्याचे सांगण्यात येते.

तब्बल 9 महिने वाहतूक बंद

पन्हाळा मुख्य रस्ता 23 जुलै 2021 रोजी खचल्याने पन्हाळ्याचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनंतर केवळ दुचाकी वाहतूक सुरू केली. मात्र, 9 महिने दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी रस्ता बंद होता. सार्वजनिक बांधकामविभागाने रस्ता दुरुस्ती केल्यानंतर नऊ महिन्यांनंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली.

Back to top button