अभूतपूर्व गर्दीने ‘पुढारी फेस्टिव्हल’ची सांगता | पुढारी

अभूतपूर्व गर्दीने ‘पुढारी फेस्टिव्हल’ची सांगता

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : येथे सुरू असलेल्या दै.‘पुढारी’च्या शॉपिंग व फूड फेस्टिव्हलला पाच दिवसांमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मंगळवारी अखेरच्या दिवशीही या प्रदर्शनामध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने प्रदर्शनाची सांगताही अभूतपूर्व गर्दीनेच झाली. सायंकाळी कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ फेम कलाकार मल्हार (सौरभ चौघुले) व अंतरा (योगिता चव्हाण) यांच्या उपस्थितीने जोरदार रंगत आली. सलग दुसर्‍या वर्षी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

दै.‘पुढारी’ने दुसर्‍यांदा घेतलेला शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल गडहिंग्लज उपविभागातील लोकांसाठी पर्वणीच ठरला. 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या या प्रदर्शनात विविध कंपन्यांच्या कार, अत्याधुनिक दुचाकी, विविध शिक्षण संस्थांचे माहिती दर्शक स्टॉल, घरगुती उपयोगाच्या वस्तू, कपडे, फर्निचर, इमिटेशन ज्वेलरी, मसाले यासह भरपूर वस्तूंचा खजिना ग्राहकांसाठी उपलब्ध होता. गडहिंग्लज उपविभागात सर्वात मोठा असा फेस्टिव्हल तसेच दर्जेदार फूड स्टॉल्ससह, अ‍ॅम्युझमेंट पार्क असल्याने सहकुटूंब खरेदीसाठी लोकांची पावले या फेस्टिव्हलकडेच वळली.

शुक्रवार व शनिवारी स्थानिक कलाकारांच्या नृत्याविष्कारासह गीतांच्या कार्यक्रमाने फेस्टिव्हलची जल्लोषात सुरू झाली. ठाण्याचे हत्तीमित्र आनंद शिंदे यांनी हत्तींसोबतचा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडत जनजागृती केली. रविवारी अली जाफर यांची ‘एक हसिन सफर’ हा गाण्यांचा कार्यक्रम झाला. सोमवारी कलर्स मराठी वाहिनीवरील ‘शेतकरीच नवरा हवा’ फेम अभिनेत्री रेवा (रूचा गायकवाड) आणि सरिता (नीता दोंडे) यांनी फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावून उपस्थितांशी संवाद साधला.

कस्तुरी क्लबच्या वतीने मिसेस कस्तुरी क्वीन ही स्पर्धा पार पडली. गेल्या पाच दिवसांत हजारो लोकांनी या फेस्टिव्हलला भेट दिली.

आबालवृद्धांनी आनंद लुटला

दै. ‘पुढारी’ने गडहिंग्लज उपविभागात सलग दुसर्‍या वर्षी भव्य असा शॉपिंग व फूड फेस्टिव्हल घेतला. गेले पाच दिवस खरेदी, खाद्याची मेजवानी सोबत मनोरंजनपर कार्यक्रम, बालचमूंसाठी खास अ‍ॅम्युझमेंट पार्क उभारल्याने आबालवृद्धांनी याचा आनंद लुटला.

Back to top button