

गारगोटी (जि. कोल्हापूर), रविराज वि. पाटील : भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करताना पोलिसांनी रंगेहात एकाला पकडले आहे. विजय लक्ष्मण कोळस्कर असे संशयीत आरोपीचे नाव आहे. जिल्हा आरोग्य पथक व जिल्हा पोलीस पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने भुदरगड तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
मडिलगे खुर्द येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य पथक व जिल्हा पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून विजय लक्ष्मण कोळस्कर याच्याकडे गर्भलिंग तपासणीसाठी एका महिलेला पाठवण्यात आले. यावेळी त्यास रंगेहात पकडले. कोळस्कर याच्या घरातील सोनोग्राफी मशीन व गर्भनिरोधक गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. जिल्हा आरोग्य पथकातील ॲड. गौरी पाटील, गारगोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद वर्धन यांच्यासह जिल्हा पोलीस पथक व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसात सुरू आहे.
दरम्यान, राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथेही धाड टाकून श्रीमंत पाटील यास गर्भलिंग निदान तपासणी करताना पोलिसांनी अटक केली. पाटील याचा मदतनीस दत्तात्रय पाटील व ढेरे यांनाही ताब्यात घेतल्याचे समजते.