हिंमत असेल तर शरद पवारांनी मुश्रीफांच्या विधानाचे समर्थन करावे : किरीट सोमय्या

हिंमत असेल तर शरद पवारांनी मुश्रीफांच्या विधानाचे समर्थन करावे : किरीट सोमय्या
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुस्लिम असल्यानेच आपल्याला टार्गेट केले जात असल्याच्या हसन मुश्रीफ यांच्या विधानाचे शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी समर्थन करावे, असे थेट आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिले. भ्रष्टाचार, घोटाळे करताना जात-धर्म आठवत नाही का? केवळ कारवाई होताच, छापे पडताच जात-धर्म आठवतो का? असा सवालही सोमय्या यांनी केला.

मृत कंपनीकडून 49 कोटी 85 लाख जमा कसे?

माऊंट कॅपिटल प्रा. लि. आणि रजत कन्झ्युमर्स सर्व्हिसेस प्रा. लि. या 15 वर्षे मृत झालेल्या कंपन्यांच्या खात्यांतून मुश्रीफ परिवाराच्या खात्यात 49 कोटी 85 लाख रुपये कसे जमा झाले? मुश्रीफ यांच्याकडे अशी कोणती किमया आहे, ती त्यांनी कोल्हापूरकरांना सांगावी. या जमा झालेल्या 49 कोटी 85 लाख रुपयांबाबत ते का बोलत नाहीत? असा सवाल करून सोमय्या म्हणाले, संजय राऊत यांच्या कृपेने आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहरबानीने अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून शरद पवार यांच्या शागिर्द मुश्रीफ परिवारास 49 कोटी 85 लाख मिळाले.

जावयासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर जिझिया कर

ग्रामविकासमंत्रिपदावर असताना कडक लॉकडाऊन असल्याचा फायदा उठवत मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या कंपनीला 1 हजार 500 कोटी रुपयांचा ठेका दिला होता. एकाच वर्षी 150 कोटी रुपयांचा महसूल घरात बसून दिला. यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर वार्षिक 50 हजार रुपयांचा जिझिया कर लावला. त्याचा शासन आदेश होऊन वर्कऑर्डरही केली. प्रकरण बाहेर येताच हा आदेश रद्द केला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचा शब्द दिला असून, चौकशी सुरू आहे. या माध्यमातून मुश्रीफांनी जावयासाठी हुंडा दिला आहे, असेही ते म्हणाले.

गतवर्षी मुश्रीफांबाबत तक्रार करताच राष्ट्रवादी व त्यांच्या समर्थकांनी मला कोल्हापूर प्रवेशबंदी केली. आंदोलने केली. ठाकरे सरकारच्या पोलिसांनी माझी अडवणूक केली. याबाबत मानवी हक्क आयोगाकडे सुनावणी झाली. याप्रकरणी पोलिसांनी माझ्या कारवाईबाबत माफीनामा दिला आहे, असेही सोमय्या म्हणाले.

मुश्रीफांच्या भ्रष्टाचाराची राज्य सरकार चौकशी करेल

मुश्रीफ यांची आयकर, 'ईडी'कडून चौकशी सुरू झाली आहे. राज्य सरकार 1 हजार 500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करेल. मुश्रीफ परिवारास 158 कोटी रुपये बोगस कंपन्यांतून आले. माऊंट कॅपिटल प्रा. लि. आणि रजत कन्झ्युमर्स सर्व्हिसेस प्रा. लि.कडून 49 कोटी 85 लाख आले; तर दरवर्षी जावयाच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला 150 कोटी मिळाले.

खा. संजय राऊत आणि सुजित पाटकर यांनी पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा आपल्या पत्नींच्या नावे जमिनी घेण्यासाठी वापरला. कोरोना काळ हे तत्कालीन सत्ताधार्‍यांसाठी कमाईचे साधन बनले. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला 100 कोटी रुपयांचा ठेका देऊन पैसे मिळविले. त्यांना हॉस्पिटल चालविण्याचा अनुभव नसताना ठेका कसा दिला? यासाठी 'मातोश्री' की भांडुपवरून फोन आला? या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचा मृत्यू झाला. या घोटाळ्याची चौकशी आणि कारवाईही होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भावना गवळी, प्रताप सरनाईक यांच्या चौकशीचे पुढे काय झाले, या प्रश्नावर सोमय्या म्हणाले, ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. विरोधकांनी न्यायालयात जावे. गतवर्षी मुश्रीफ यांच्याबाबत तक्रार करताच राष्ट्रवादी व त्यांच्या समर्थकांनी आपल्याला कोल्हापूर प्रवेशबंदी केली. आंदोलने केली. ठाकरे सरकारच्या पोलिसांनी माझी अडवणूक केली. याबाबत मानवी हक्क आयोगाकडे सुनावणी झाली. याप्रकरणी पोलिसांनी आपल्यावरील कारवाईबाबत माफीनामा दिला आहे, असेही सोमय्या म्हणाले.

पत्रकार परिषदेस भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, राहुल चिकोडे, विजय जाधव, हेमंत आराध्ये, अशोक देसाई, सत्यजित कदम, सुनील कदम उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news