मनपासह सर्व निवडणुका भाजप-शिंदे गट एकत्र लढणार : चंद्रकांत पाटील | पुढारी

मनपासह सर्व निवडणुका भाजप-शिंदे गट एकत्र लढणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील आगामी महापालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपकडून एकत्रित लढविल्या जातील. त्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांना साथ द्या, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. या निकालामुळे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. अनेकांच्या मदतीने हा विजय मिळविला आहे. निवडणुकांची रांग आहे. जि. प., पंचायत नगरपालिका, दोन महापालिका निवडणुका आहेत. या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रित निवडणूक लढवायची आहे. या निवडणुका घरातील लग्न समारंभ समजून लढल्या पाहिजेत. आगामी निवडणुका जिंकायच्या आहेत. गावपातळीवर जनतेशी नाळ घट्ट होईल याची खबरदारी घ्या. मतभेद विसरून कामाला लागावे. पंचायत समिती गावपातळीपर्यंत शिवसेना व भाजप यांचे घट्ट नाते निर्माण झाले पाहिजे. मतभेद होऊदे, मात्र मनभेद होऊ देऊ नका, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला.

मंत्री पाटील म्हणाले, भाजपचे सुरेश हाळवणकर, खा. धनंजय महाडिक तसेच शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर, खा. धैर्यशील माने यांची संयुक्त समिती नेमून विकास निधीचे नियोजन करूया. जिल्ह्याचा विकास निधी महिनाभरात वाटप केला पाहिजे. या निधीतून वेळेत कामे पूर्ण करा.

Back to top button