कोल्हापूर : ऑनलाईन शिक्षणाचे ऑफलाईन साईड इफेक्टस्! | पुढारी

कोल्हापूर : ऑनलाईन शिक्षणाचे ऑफलाईन साईड इफेक्टस्!

कोल्हापूर : कृष्णात चौगले

कोरोनामुळे जग थांबलेले असताना गेल्या दीड वर्षापासून शाळाही बंद होत्या. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व शिक्षणापासून ते दूर जाऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अंगिकारला गेला होता. परिणामी विद्यार्थी काही वेळ ऑनलाईन शिक्षण अन् दिलेला अभ्यास यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात राहिली. विद्यार्थी शैक्षणिक वातावरणात रमले. या चांगल्या परिणामाबरोबर काही साईड इफेक्टस् मात्र पालकांची चिंता वाढवणारे आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून हे ऑनलाईन शिक्षण सुरू राहिल्याने याला विद्यार्थी कंटाळले आहेत.तोचतोचपणा नकोसा वाटत आहे. ऑनलाईनमुळे या सहज शिक्षणापासून विद्यार्थी दुरावले गेले. प्रत्यक्ष शाळेत असणारे शिक्षण व ऑनलाईन शिक्षणात मोठा फरक जाणवत आहे.

शाळेत पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त मिळणारे सहज शिक्षण या ऑनलाईन क्लासमध्ये मिळत नाही. त्यामुळे रमत गमत मित्रांच्या सोबत होणारा मोकळेपणाचा अभ्यास या दरम्यान झाला नाही. वेळेवर अभ्यास पूर्ण न करणे, गृहपाठाकडे दुर्लक्ष, काही वेळा तब्येतीचे कारण सांगून ऑनलाईन तासाला हजेरी न लावणे, हजर असल्यास दुर्लक्ष करणे अशा काही बाबी पालकांच्या निदर्शनास येत आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर झाला आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

मुलांसाठी हे करा…

मुलांना मोकळेपणाने खेळू द्या. दररोज व्यायामाची सवय लावा. नियमित अभ्यास व पूर्ण शारीरिक हालचाली होतील असे काही खेळ शिकवा. मोबाईल काही दिवस दूर ठेवा. झोपण्यापूर्वी टीव्ही, गॅझेट, लॅपटॉप व मोबाईल जाणीवपूर्वक टाळा. पालकांनी दिवसांतून काही वेळ त्यांच्यासाठी द्यावा.

पालकांना भुर्दंड

काम बंद झाल्याने पोटा-पाण्याची अडचण असताना मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन घ्यावे लागले. तसेच मोबाईल रिचार्जही करावे लागल्याने सर्वसामान्य पालकांना फटका बसला.

आरोग्यावर परिणाम

शारीरिक हालचाली कमी झाल्या. लठ्ठपणा व तत्सम व्याधी जडू लागल्या.ऑनलाईन वर्गासाठी ताठ बसावे लागत असल्याने पाठदुखीचा त्रास सुरू झाला. डोळ्यांचे विकार जाणवू लागले.

मानसिकतेवर परिणाम

ऑनलाईन शिक्षणामुळे तोचतोचपणा आला. परिणामी चिडचिड, हट्टीपणा वाढला. एकलकोंडेपणा वाढला. काही वेळा काही न करता एकाजागी शांत बसून राहणे हाही वेगळा विकार जडण्याची भीती आहे.

Back to top button