कोल्हापूर : वारूळ येथे गॅस टँकरला आग; चालक गंभीर जखमी | पुढारी

कोल्हापूर : वारूळ येथे गॅस टँकरला आग; चालक गंभीर जखमी

मलकापूर: पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर वारूळ (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीत गॅस टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटून आंब्याच्या झाडावर टँकर आदळला. या अपघातानंतर अचानक लागलेल्या आगीत टँकरचे केबिन जळून खाक झाले. यात चालक चांगदेव माधवराव पाटील (वय ४५, रा. परभणी) जखमी झाले. अग्निशामक दलासह स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून कोल्हापूरकडे (kA 01 AH0353) टँकर निघाला होता. टँकर वारूळ गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या आंब्याच्या झाडावर टँकर आदळला. त्यानंतर केबीनने अचानक पेट घेतला. काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केले. टँकरमध्ये 35 हजार लिटर एचपीचा गॅस भरलेला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वारूळ गावातील प्राथमिक शाळा, नागेश्वर हायस्कूल व नागरिकांना दोन किलोमीटर अंतरावर हलविण्यात आले.

दरम्यान, मलकापूर नगरपरिषद, पन्हाळा नगरपरिषद आणि वारणा साखर कारखाना यांच्या अग्निशामक बंबानी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी दोन रुग्णवाहिकासह आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते.

गॅस टँकरला आग लागल्याची बातमी पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर सकाळी  साडेदहा वाजल्यापासून दुपारपर्यंत सुमारे ८ तास वाहतूक कोंडी झाली होती. मलकापूरचा आठवडा बाजार असल्याने वाहतूक ठप्प झाल्याने बाजारपेठेवर परिणाम दिसत होता. वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी शाहूवाडी पोलिसांनी विशेष सतर्कता घेतली. जखमी चालक चांगदेव चाटे याच्यावर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. पल्लवी गुंडाप्पा यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी चालकाला कोल्हापूर येथील सीपीआरला पाठविण्यात आले.

घटनास्थळी तहसीलदार गुरु बिराजदार, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका सराटे, तालुका वैद्यकीय अधिकारी एच. आर. निरंकारी, माजी सभापती विजय खोत आदींसह शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी,  आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button