कोल्हापूर-बंगळूर-कोईम्बतूर ‘इंडिगो’ची आजपासून विमानसेवा | पुढारी

कोल्हापूर-बंगळूर-कोईम्बतूर ‘इंडिगो’ची आजपासून विमानसेवा

उजळाईवाडी; पुढारी वृत्तसेवा :  ‘इंडिगो’ची कोल्हापूर-बंगळूर-कोईम्बतूर विमानसेवा शुक्रवार (दि. 13) पासून सुरू होत आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून या विमानसेवेचा प्रारंभ करतील. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर विमानतळावर शाहू महाराज, खासदार सर्वश्री संजय मंडलिक, धर्यशील माने व धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील व जयश्री जाधव उपस्थित राहणार आहेत. दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

कोल्हापूर विमानतळावरून ‘इंडिगो’ची हैदराबाद, अहमदाबाद, तिरुपती विमानसेवा सुरू आहे; तर ‘स्टार एअर’ची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू आहे. यामध्ये शुक्रवारपासून कोल्हापूर-बंगळूर-कोईम्बतूर विमानसेवेची भर पडत आहे. आठवड्यातील सातही दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी विमान कोल्हापूर विमानतळावर येईल, तर सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी कोल्हापूरहून बंगळूरकरिता विमानाचे उड्डाण होईल. पहिल्या दिवसासाठी येणार्‍या 70 हून अधिक प्रवाशांनी बुकिंग केले आहे; तर कोल्हापूरहून जाण्यासाठी 50 प्रवाशांनी बुकिंग केले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उद्योग, व्यापार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सेवेमुळे ‘इंडिगो’ची विमानसेवा कोल्हापूरहून देशातील प्रमुख बत्तीस शहरांशी जोडली जाणार आहे.

Back to top button