साखर उतार्‍यात कोल्हापूर जिल्हा अव्वल | पुढारी

साखर उतार्‍यात कोल्हापूर जिल्हा अव्वल

कौलव, राजेंद्र दा. पाटील : राज्यातील साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामाला चांगलाच वेग आला असून राज्यात 579 लाख टन उसाचे गाळप होऊन 560 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस गाळपात सोलापुर विभागाने तर सरासरी साखर उतार्‍यासह साखर उत्पादनात कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्याचा सरासरी साखर उतारा घटला आहे.

चालू गळीत हंगामात राज्यात 101 सहकारी व 97 खासगी अशा एकूण 198 साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. गतवर्षी याच दिवसात 96 सहकारी व 95 खासगी अशा 191 कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. राज्यात सरासरी दोन महिन्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. यंदाच्या हंगामात राज्यात 1500 लाख टन ऊस गाळप होईल, असा अंदाज आहे.

दि. 9 जानेवारीपर्यंत सोलापूर विभागातील 47 कारखान्यांनी 144.16 लाख टन उसाचे गाळप करून 123.37 लाख क्विंटल साखर उत्पादित केली असून सरासरी साखर उतारा 8.56 टक्के आहे.

कोल्हापूर विभागातील 34 कारखान्यांनी 134.20 लाख टन उसाचे गाळप करून 146.99 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून सरासरी साखर उतारा 10.95 टक्के एवढा राज्यात उच्चांकी आहे.

राज्यातील 198 कारखान्याने 579.70 लाख टन उसाचे गाळप करून 560.17 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.49 टक्के एवढा आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यात 20 लाख टनांनी ऊस गाळप जादा झाले असून साखर उतार्‍यात मात्र काहीशी घट झाली आहे.

गतवर्षी याच दरम्यान 9.82 टक्के एवढा साखर उतारा होता. त्या तुलनेत यंदा उतारा कमी झाला आहे. नागपूर विभागाने सर्वात कमी 2 लाख 30 हजार टन उसाचे गाळप केले असून 8.13 टक्के एवढा नीचांकी साखर उतारा आहे.

Back to top button