कोल्हापूर : खून, मारामार्‍यांमुळे राजारामपुरी अशांत! | पुढारी

कोल्हापूर : खून, मारामार्‍यांमुळे राजारामपुरी अशांत!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राजेंद्रनगरातील गँगवॉरमधून कुमार गायकवाडचा झालेला खून, चिन्या हळदकर या अट्टल गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून यासह दौलतनगर, यादवनगर, सुभाषनगर, नेहरूनगरातील हाणामार्‍यांमुळे राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वातावरण अशांत बनले आहे.

शहरातील सर्वाधिक झोपटपट्टीचा भाग राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. तसेच मारामारी, चोरी, संघटीत गुन्हेगारीचे आव्हानही या पोलिस ठाण्यासमोर आहेच. मागील वर्षभरात चोरीचे 92 गुन्हे घडले आहेत. यातील केवळ 19 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. मोटारसायकल चोरीच्या 41 घटना घडल्या असून यातील 18 उघड झाल्या आहेत.

आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

राजारामपुरी पोलिस ठाणे हद्दीत वर्षभरात जबरी चोरीचे 23 गुन्हे घडले. यापैकी 11 गुन्ह्यांचा तपास करून यातून 2 लाख 47 हजारांचा मुद्देमाल परत मिळवून देण्यात यश आले. घरफोडीच्या 14 गुन्ह्यांत 5 लाख 91 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. यापैकी 2 गुन्हे उघड झाले असून 3 लाख 19 हजारांचा माल परत मिळविण्यात आला.

24 लाखांचा माल केला जप्त

जुगार अड्ड्यांवरील 65 कारवायांतून 6 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारूबंदी कायद्यान्वये 132 कारवाया करून 17 लाख 48 हजारांचा माल जप्त केला आहे. या कारवाया सर्वाधिक प्रमाणात राबविण्यात आल्या आहेत.

Back to top button