चारचाकीने फरफटत नेलेल्या हेरलेतील ‘त्या’ तरुणाचा मृत्यू | पुढारी

चारचाकीने फरफटत नेलेल्या हेरलेतील ‘त्या’ तरुणाचा मृत्यू

शिरोली एमआयडीसी,  पुढारी वृत्तसेवा : पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथील एका हॉटेल मध्ये मित्रा सोबत जेवायला गेलेला तरुणास चारचाकीधारकाने फरफटत नेल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. मंगळवारी त्याचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्युनंतर रुग्णालयाच्या आवारात नातेवाईक आणि मित्रांनी सीपीआर मध्ये मोठी गर्दी केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होते.

याबाबतची माहिती अशी की, अक्षय लोखंडे हा 27 वर्षीय तरुण पाच जानेवारी रोजी आपल्या मित्रा सोबत सांगली फाटा येथील एका हॉटेल मध्ये जेवायला गेला होता. या ठिकाणी जेवन झाल्यानंतर कर्नाटक पासिंग असलेली चारचाकीतील दोन अनोळखी व्यक्तीशी झालेल्या वादानंतर त्यांनी अक्षयला गाडीसोबत फरफटत नेले होते. यामध्ये अक्षयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने सीपीआर मध्ये दाखल करून अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

मंगळवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना घडून चार दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप अक्षयच्या नातेवाईकांनी केला. जोपर्यंत पोलिसांकडून आरोपींच्या कारवाईचं ठोक आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा अक्षय च्या नातेवाईकांनी घेतला होता. यावेळी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

अक्षय हा डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफ म्‍हणून काम करत होता. तो घरातील एकुलता एक कमवता असल्याने कुटुंबाची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती. अक्षयच्या मृत्यूने कुटुंबाचा मोठा आधार निघून गेला. काही दिवसांत त्याचे लग्न होणार होते, त्याआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं नातेवाईक, मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मृतदेहावर कोल्हापूर येथे आंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Back to top button