

कोल्हापूर, गौरव डोंगरे : संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत, आपटेनगर, फुलेवाडी या उपनगरांच्या भागांसह शिवाजी पेठ व मंगळवार पेठेचा भाग जुना राजवाडा पोलिसांच्या हद्दीत आहे. अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, रंकाळा या प्रमुख वर्दळीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवताना चांगलीच धावपळ होते. पोलिस ठाण्याला 95 मनुष्यबळ मंजूर असले, तरी सध्या 79 पोलिसांवर मदार आहे. रिक्त पदांसह पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण मोठे आहे.
मागील वर्षभरात जुना राजवाड्याकडे 96 मोटारसायकल चोरींची नोंद झाली आहे. यापैकी 46 गुन्हे उघडकीत आणण्यात यश आले. यामध्ये शहरातील इतर पोलिस ठाण्यांकडील 20 दुचाकीं चोरीचे गुन्हे उघड झाले. दोघा अट्टल दुचाकी चोरट्यांकडून 24 वाहने जप्त करण्यात आल्या. पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे 43 गुन्हे घडले असून यापैकी 14 गुन्ह्यांचा यशस्वी तपास झाला आहे. घरफोडीचे 13 प्रकार घडले असून यातील 6 गुन्ह्यांची उकल झाली आहे.
आंतरराज्य गुन्हेगारांना अटक
व्यापार्यांची दिशाभूल करणार्या 3 आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करण्यात आली. जबरी चोरीचे 6 गुन्हे घडले असून यापैकी 4 उघडकीस आणण्यात आले. चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यातील इराणी टोळीतील अट्टल संशयित शब्बीर जाफरी याला पाठलाग करून जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने पकडले.
15 लाखांचा मुद्देमाल जप्त
जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात जुगार अड्ड्यांवर छाप्यांचे 98 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 4 लाख 44 हजार 848 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारुबंदी कायद्यान्वये 88 गुन्हे दाखल करत 10 लाख 92 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तसेच बेकायदा हत्यार बाळगणार्या 16 जणांवर पकडण्यात आले.
47 संशयितांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव
रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात 3 टोळ्यांतील 31 जणांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव, 12 जणांना 2 वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर हद्दपारीचे प्रस्ताव, दारुबंदी अधिनियमांतर्गत 4 जणांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव बनवून मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. वारे वसाहत येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार पृथ्वीराज विलास आवळे याच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचा पाठपुरावा करून संशयिताला 1 वर्षासाठी कळंबा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.