सुपारीबहाद्दरांची दहशत : कोल्हापुरात खासगी सावकारांकडून बेधडक लूट, कुळे काढणार्‍या सुपारीबहाद्दरांची दहशत | पुढारी

सुपारीबहाद्दरांची दहशत : कोल्हापुरात खासगी सावकारांकडून बेधडक लूट, कुळे काढणार्‍या सुपारीबहाद्दरांची दहशत

कोल्हापूर : दिलीप भिसे : खासगी सावकारांकडून बेधडक लूट, कुळे काढणार्‍या सुपारीबहाद्दरांची दहशत, खंडणी वसुली, ब्लॅकमेलिंग, लुटमारीसह तस्करीतून विनासायास मिळणार्‍या मिळकतीतून नामचीन गुंडांना पोसण्याचा धंदा सुरू झालाय… राजकीय वरदहस्त आणि चिरीमिरीला भुललेल्या शुक्राचार्यांमुळे सराईत टोळ्यांवर ‘ना कायद्याचा… ना पोलिस यंत्रणेचा धाक…’ अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
किरकोळ वादातून मारामारी, जीवघेणे हल्ले होताहेत. वर्चस्वातून प्रतिस्पर्धी गटातील धुमश्चक्रीची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे. सुशिक्षित तरुणही पोलिसांच्या रेकॉर्डवर येऊ लागले आहेत.

सुपारीबहाद्दरांची दहशत पोलिसांचा धाकच नाही उरला!

राजारामपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरीसह करवीर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारी टोळ्यांचे प्रस्थ वाढले आहे. मटका, जुगारासह तीनपानी पत्त्यांचे क्लब सुरू आहेत. देशी, विदेशी दारूसह गुटख्याच्या तस्करीतून रोज लाखोंची उलाढाल सुरू आहे. क्रिकेट बेटिंगही सुरूच आहे. अर्थात हा मामला पोलिसांना माहीत नाही, असेही नाही.

गुन्हेगारांच्या बेहिशेबी मालमत्तांचे गूढ

दहा-पंधरा वर्षांपूर्वी भिकेकंगाल झालेले काही गुंड व त्यांच्या साथीदारांच्या सध्याच्या बेहिशेबी मालमत्ता डोळे दीपवणार्‍या आहेत. एकेकाळी मोडक्या-तोेडक्या दुचाकीवरून वावरणार्‍या म्होरक्यांकडे लाखोंच्या महागड्या मोटारींचा ताफा पाहायला मिळतो. आलिशान बंगल्यावर कोट्यवधींची उधळण करण्यात आल्याचे चित्र आहे. (उत्तरार्ध)

सुपारीदादांकडून गोरगरीब तरुणांचा वापर

विनासायास मिळकतीतून मालामाल झालेल्या गुंडांकडून 17 ते 25 वयोगटातील तरुणांना गुन्हेगारी कृत्याचे धडे देणार्‍या शाळा सुरू झाल्या आहेत. अमली पदार्थांसह देशी, विदेशी दारूचा मुबलक पुरवठा होऊ लागला आहे. नशेत झिंगणार्‍या तरुणांचा मारामारीसह अन्य गंभीर गुन्ह्यांत वापर होऊ लागला आहे. सुपारी घेऊन कुळांना हाकलून लावण्यासाठी बळाचा वापर सुरू झाला आहे.

खासगी सावकारांचा धुमाकूळ

दरमहा 35 ते 40 टक्के व्याजाने वसुली करणार्‍या शंभरावर सावकारी टोळ्यांची शहरासह उपनगरांत कमालीची दहशत आहे. दहशत आणि वसुलीसाठी कमिशनवर तरुणांचा वापर केला जात आहे. कमिशनमधील पैशातून काही तरुणांनी सावकारी सुरू केली आहे.

पोलिसांकडून उफराटा सल्ला

शहरातील एका हॉटेलचालकाने व्यावसायिक कारणासाठी सावकारांकडून 15 लाखांचे कर्ज घेतले. त्या मोबादल्यात 45 लाखांची वसुली झाली; शिवाय काही मालमत्ताही सावकाराच्या कब्जात आहेत. मुद्दल रक्कम देऊनही आणखी काही लाखांची मागणी होऊ लागल्याने व्यावसायिकाने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. मार्च, एप्रिलपासून आजअखेर त्यांनी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवलेत; पण त्याची दखल घेतलेली नाही. उलट हवालदाराने तीन-साडेतीन लाखांची रक्कम सावकाराला देऊन परस्पर विषय संपवून टाका, असा सल्ला देत हॉटेल चालकाची बोळवण केली आहे.

Back to top button