

कोल्हापूर, डॅनियल काळे : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी शासनाकडे पाठविलेल्या आराखड्यास मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. यासाठी आता 43 कोटी रुपये मिळणार असल्याने सीपीआरचे रुपडेच पालटणार आहे. गेले अनेक महिने हा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. अखेर शासनाने यावर मंजुरीची मोहोर उठविली. निधी वर्ग करण्यांसदर्भातील आदेश लवकरच काढला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय हे 1884 पासून कोल्हापूरात सुरू आहे. मूळ इमारत हेरिटेजमध्ये आहे. या परिसरात एकूण 33 इमारती असून त्या वेगवेगळ्या कालावधीत बांधल्याने त्यांना जोडणारे रस्ते, पाणी, ड्रेनेजलाईन या सुविधा सोयीनुसार केल्या आहेत. त्यामध्ये सुसूत्रता नाही. यापैकी अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. तेथील शौचालयांची स्थिती दयनीय आहे. इमारतीवरील प्लबिंग खराब झाल्याने सांडपाण्यासह ड्रेनेजही भिंतीवरूनच गळत आहे. त्यामुळे इमारतींची स्थिती चांगली नाही. अपघात विभागाच्या इमारतीसह अनेक इमारतींची दुरवस्था झाल्याने या इमारतींचे नूतनीकरण, मजबुतीकरण, परिसरात रस्ते, ड्रेनेजलाईन, युटीलिटी शिफ्टिंग आदी कामे करण्याची गरज होती. यासाठी भरीव निधीही लागणार होता. त्यामुळे सर्वंकष कामांचा आराखडा तयार करून तो काही वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. नुकतीच त्याला मंजुरी मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे सुधारणा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या कामांचा समावेश
* सर्व इमारतींमधील विद्युतीकरण
* स्वच्छतागृहे, फरशी बसविणे
* युटिलिटी शिफ्टिंग, केबल टाकणे
* नवी पाणीपुरवठा व्यवस्था
* अंतर्गत रस्ते, सुधारणा करणे
* सीपीआर आवारात नव्या ड्रेनेजलाईन टाकणे
* मुख्य इमातरतीची देखभाल व दुरुस्ती
* बर्न वॉर्डचे नूतनीकरण करणे
* परिसरातील सर्व इमारतींची दुरुस्ती, देखभाल
इमारती झाल्या; आता मशिनरीचे काय?
सीपीआरमध्ये अंतर्गत सुधारणा, इमारतीची डागडुजी या निधीतून होणार ही चांगलीच बाब आहे. परंतु, या कामांइतकेच सीपीआरमधील निदान व्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे. निदान व्यवस्था सक्षम झाली, तर सर्वसामान्य रुग्णांवर आर्थिक भार कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे एमआरआय सिटी स्कॅन मशिनची येथे आवश्यकता आहे. त्यासाठीही निधीची गरज आहे.