छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू यांचा वारसा शाहू महाराज यांनी पुढे नेला : शरद पवार

छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू यांचा वारसा शाहू महाराज यांनी पुढे नेला : शरद पवार
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सत्ता हातात आल्यावर ती सामान्यांसाठी वापरायची असते, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिला. देशात अनेक राजे-रजवाडे आले आणि गेले; पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. तर समतेची विचारधारा कृतीत आणणारा राजा म्हणून देशभर राजर्षी शाहू छत्रपतींचे नाव घेतले जाते. त्यांच्या या कार्याचा वारसा पुढे नेत शाहू महाराज यांनी कुस्ती, खेळ, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रांत कार्य करून तसेच संकटात राजवाड्यात न राहता जनतेबरोबर राहून केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. सत्काराला उत्तर देताना शाहू महाराज यांनी कुस्तीला गतवैभव प्राप्त व्हावे, असे आपले मनोगत व्यक्त केले. कुस्त्यांच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

शाहू महाराज यांचा त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाहू महाराज यांचा सत्कार सोहळा होत आहे, तो आनंद देणारा असल्याचे सांगत पवार म्हणाले की, काही राज्ये ही त्या कुटुंबाच्या नावाने ओळखली जात होती. कुठे मोघल, तर कुठे जयपूर अशी घराणे होती; पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले राज्य एका कुटुंबाच्या नावाने नव्हते. ते भोसले यांचे राज्य नव्हते; तर ते रयतेचे राज्य होते. हिंदवी स्वराज्य होते आणि हा इतिहास छत्रपतींच्या घराण्याने जपला आहे. या देशातील प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिमान आहे. समतेची विचारधारा राजर्षी शाहू छत्रपतींनी जपली.

सामान्यांचे दुःख दूर करण्यात अग्रभागी

शाहू महाराज हे छत्रपती आहेत. राजे आहेत; पण त्यांचे लक्ष शेवटच्या माणसासाठी असते. अनेकवेळा मी पाहिले की, ज्यावेळी या महाराष्ट्रावर संकट आले. कधी भूकंप झाला, कधी महापूर आला, कधी कोरोनाचे संकट आले, ज्या ज्यावेळी जनतेवर संकट आले, त्या त्यावेळी छत्रपती राजवाड्यात राहिले नाहीत, पॅलेसमध्ये राहिले नाहीत; तर ते सामान्य माणसाचे दुखणे दूर करण्यासाठी अग्रभागी राहिले. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले की, अशा राजाचा या ठिकाणी सत्कार होत आहे, याचा आनंद आपल्या सर्वांना आहे. 75 वर्षे झाली या संपूर्ण काळात त्यांनी अनेक गोष्टी उभा केल्या. कुस्तीचे क्षेत्र असो, खेळाचे क्षेत्र असो की, शैक्षणिक क्षेत्र असो, या सर्वच क्षेत्रांत अनेक प्रकारच्या संस्था त्यांनी उभा केल्या. त्या कोल्हापुरात असतील, पुण्यात असतील किंवा अन्यत्र असतील, त्या उत्तमरीतीने चालवण्याची भूमिका शाहू महाराज यांनी घेतली. या विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व त्यांनी दाखवले आणि छत्रपतींचा इतिहास हा जनमानसाच्या अंत:करणामध्ये द़ृढ केला. अशा राजांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना अंत:करणापासून शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करतो. त्यांचे हे मार्गदर्शन केवेळ करवीरच्या जनतेलाच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्राला अखंड मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देऊ : पालकमंत्री

राजर्षी छत्रपती शाहू हे जनेतेचे राजे होते. जनतेमध्ये मिसळण्याची आणि त्यांना मदत करण्याची परंपरा आजही शाहू महाराजांनी जपली आहे. कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शहरातील तालमींच्या दुरुस्तीसाठी शासनातर्फे निधी दिला जाईल. फुटबॉलची परंपरा असणार्‍या या नगरीत आगामी वर्षात शासनामार्फत फुटबॉल स्पर्धा घेतली जाईल. पंचगंगा प्रदूषण रोखण्याचे काम सुरू असून, दोन वर्षांत पन्नास टक्के प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करू. दसरा महोत्सवास आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे नियोजन केले जाईल. त्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटनासही चालना मिळेल, असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

जनतेबरोबर राहणारे राजे : चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कर्तृत्व आणि नम्रता या दोन्ही गोष्टी एकत्र पाहण्यास मिळत नाहीत. परंतु, शाहू महाराज याला अपवाद आहेत. जनतेला सोबत घेऊन जाणार्‍या राजांबद्दलच जनतेला आपुलकी व प्रेम मिळते. हे शाहू महाराज यांच्या माध्यमातून दिसून आले. जनतेच्या अडचणीच्या काळात आपली सर्व यंत्रणा खुली करून शाहू महाराज यांनी कोल्हापूरच्या जनतेला मदतीचा हात दिला. शाहू महाराज यांच्याकडे असणार्‍या दहा हजार पुस्तकांच्या संग्रहामुळे त्यांच्या व्यासंगाचे दर्शन घडते.

राजर्षींचे विचार पुढे नेले :ः हसन मुश्रीफ

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूरची खंडित झालेली कुस्ती स्पर्धेची परंपरा यानिमित्ताने पुन्हा सुरू होत आहे. राजर्षी शाहूरायांचे विचार शाहू महाराज आपल्या कार्यकर्तृत्वातून पुढे नेत आहेत.

समतेची लढाई पुढे नेलीः सतेज पाटील

आमदार सतेज पाटील म्हणाले, पुरोगामी व समतेचा विचार पुढे नेण्याचे काम शाहू महाराज यांनी नेहमीच केले आहे. विचारांत कोणताही बदल नाही. सत्य आहे ते लोकांना सांगण्याची भूमिका शाहू महाराज यांनी घेतली. विचारांची लढाई विचारांनीच करण्याची शिकवण त्यांनी तरुणांना दिली आहे.

कुस्तीला गतवैभव मिळावे : छ. शाहू महाराज

सत्कारास उत्तर देताना शाहू महाराज यांनी 75 वर्षे कोल्हापुरात कशी गेली हे समजलेही नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कुस्तीपंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूरमध्येच कुस्ती मागे पडत चालली आहे. त्यामुळे भविष्यात कुस्तीला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मल्ल कुठलाही असो, त्याच्या चांगल्या कुस्तीचे कौतुक आणि चीज कोल्हापुरातच होते, असेही ते म्हणाले.

जुन्या आठवणींना उजाळा

दोन ते तीन वर्षांनंतर कोल्हापुरात कुस्त्यांचे मैदान भरले आहे, याचा आनंद आहे. माझा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्याची जनतेची इच्छा झाली. राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज, शहाजी महाराज या सर्वांनी कुस्तीस प्रोत्साहन दिले, असे सांगून त्यांनी 1962 साली पाकिस्तानातील दोन मल्लांत झालेल्या कुस्तीची आठवण करून दिली. कोल्हापुरात कुस्त्या रंगतात. पैलवान जीवापाड प्रयत्न करून जिंकण्याचा प्रयत्न करतात. मल्ल हरला तरी त्याच्या जिद्दीचे कोल्हापुरात कौतुक केले जाते, असेही ते म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केले. कार्यक्रमास डॉ. डी. वाय. पाटील, खा. श्रीनिवास पाटील, खा. संजय मंडलिक, खा. धनंजय महाडिक, आ. पी. एन. पाटील, आ. प्रकाश आवाडे, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजूबाबा आवळे, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, ले. ज. मेजर पन्नू, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार राजीव आवळे, संग्रामसिंह भोसले, संभाजीब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, समरजित घाटगे, आर. के. पोवार, सचिन चव्हाण, राहुल चिकोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. माजी खासदार संभाजीराजे यांनी आभार मानले.

महाराजांना दुसरा पाहुणा चालला नसता

शाहू महाराज यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार होतोय याचा मला मनस्वी आनंद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू यांच्या विचारांचा वारसा जपणारे शाहू महाराज यांच्या सत्कारासाठी दुसरा पाहुणा चालला नसता, असे मी प्रांजळपणे सांगतो, असे संभाजीराजे आभार मानताना म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news