कोल्हापूर : शाहू महाराज यांचा आज अमृत महोत्सव | पुढारी

कोल्हापूर : शाहू महाराज यांचा आज अमृत महोत्सव

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शाहू महाराज शनिवारी (दि. 7) 75 वर्षे पूर्ण करून 76 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खासबाग कुस्ती मैदानात सायंकाळी शाहू महाराज यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

याचवेळी राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने दुपारी 3 वाजल्यापासून राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात बेमुदत निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे. मुख्य मोठ्या पाच कुस्त्यांसह 107 चटकदार कुस्त्यांसाठी तब्बल 15 लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्यांना शरद पवार, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व लोकप्रतिनिधींच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाणार आहे. शाहू महाराज यांना चांदीची गदा देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त 76 व्या संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेच्या ग्रुप 4 मधील सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता, शाहू महाराज यांच्या हस्ते स्पर्धेची सुरुवात होईल. यावेळी संभाजीराजे, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सदस्य मालोजीराजे, ‘विफा’च्या महिला समिती अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड व शिष्यवृत्तीचे वितरण

शनिवारी सकाळी 9 वाजता, ‘सीएसव्ही’च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाहू महाराजांचे भव्य स्वागत न्यू पॅलेस ते छत्रपती शाहू विद्यालय मार्गावर करण्यात येणार आहे. यानंतर शाळेत सकाळी 10 वाजता छत्रपती शाहू महाराज एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड व स्कॉलरशिपचे वितरण होणार आहे. शाहू महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त यंदा पहिल्या वर्षी 75 हजारांचा पुरस्कार दिला जाणार आहे. यानंतर पुढील प्रत्येक वर्षी या पुरस्काराची रक्कम एक हजार रुपयांनी वाढविण्यात येणार आहे.

शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके

कोल्हापूर जिल्हा लाठी-दांडपट्टा असोसिएशनच्या वतीने शहरी व ग्रामीण आखाड्यांतर्फे सकाळी 7 वाजल्यापासून जुना राजवाडा-भवानी मंडप येथे शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.

राजर्षी शाहू सलोखा रॅली

शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठा महासंघाच्या वतीने सकाळी 10 वाजता राजर्षी शाहू सलोखा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

Back to top button