कोल्हापूर : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ८ लाखांचा मुद्देमाल जप्त; ४२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

कोल्हापूर : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ८ लाखांचा मुद्देमाल जप्त; ४२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुरगूड, पुढारी वृत्तसेवा : अर्जुनी (ता.कागल) येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात १७ दुचाकी, २७ मोबाईल व ५५ हजार २७० रुपयाची रोकड असा एकूण ८ लाख २० हजारचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी जुगार खेळणाऱ्या ४२ जणांविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. तसेच व्यवसायाचा मूळ मालक अमर शिवाजीराव चव्हाण (रा. यादवनगर, कोल्हापूर) याच्यावर सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या विशेष पथकाने केली.

या प्रकरणी व्यवसायाचा मूळ मालक अमर चव्हाण (रा. यादवनगर, कोल्हापूर), व्यवसाय चालक संभाजी बाबुराव जामदार व व्यवसाय जागा मालक संजय सुभाष सांगावकर (दोघेही रा. निपाणी) यांच्यासह जुगार महाराष्ट्र व कर्नाटकातील ४२जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी याबाबत मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमर चव्हाण व संभाजी जामदार या दोघांनी संजय सांगावकर यांच्या मालकीच्या जुगार क्लब व त्याच्या शेजारीच धिरज पाटील हे कल्याण मटका घेत होते. जुगार अड्डयावर तर रोज यात्रा भरल्यासारखी गर्दी होते. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमाभागातील लोक येथे जुगार खेळत होते. याची गुन्हा अन्वेषणला माहिती मिळताच गुरूवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत वाहने, मोबाईल व रोकड असा आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या अड्डयावर जुगार खेळण्यास आलेल्या ३८ जणांसह क्लबचे चालक व मालक यांच्यासह ४२ जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीसह इतरांना अटकही करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button