रिकामटेकड्या तरुणांचा उद्योग; दुचाकी चोरून परत करण्याचा फंडा | पुढारी

रिकामटेकड्या तरुणांचा उद्योग; दुचाकी चोरून परत करण्याचा फंडा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  डुप्लिकेट चावीने दुचाकी सुरू करून ती दिवसभर फिरवून पुन्हा रस्त्याकडेला सोडण्याचा फंडा शहरातील काही रिकामटेकड्या तरुणांनी अवलंबला आहे. प्रत्यक्षात चोरी करायची; पण सापडलाच तर चूक झाल्याचा आव आणायचा, अशी पद्धत या भामट्यांकडून सुरू आहे. पोलिसही अशा महाभागांना चांगलेच ओळखून आहेत. मात्र, रितसर तक्रार करण्याअगोदरच अशा प्रकरणांवर पडदा पडत असल्याने कायदेशीर कारवाई करणे अवघड होऊन बसले आहे.

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, करवीर तहसील कार्यालय, कृषी, आयकर, आरटीओ कार्यालयासह विविध पोलिस ठाण्यांमध्ये विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकी कार्यालयांच्या आवारात पार्किंग केलेल्या दिसून येतात. यातील एका दुचाकीला बनावट चावीने सुरू करून ती दिवसभर वैयक्तिक कामासाठी फिरवली जाते. दुचाकीतील पेट्रोल संपल्यावर ती तिथेच लावली जाते. दोन-तीन दिवसांनी ती मूळ मालकाला मिळते; परंतु तोपर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार करून संबंधित दुचाकीच्या मालकाची ससेहोलपट होते, शिवाय मनःस्तापाला सामोरे जावे लागते. काही वेळा दुचाकी परत करून माफी मागितली जाते व प्रकरण पोलिस ठाण्याबाहेरच मिटवले जाते.

दादा माफ करा, चुकून नेली गाडी

करवीर तहसील कार्यालय, सीपीआर रुग्णालय आवारात दुचाकी चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. बुधवारी दुपारी एक जण कामानिमित्त टाऊन हॉलनजीक आला होता. दुचाकी रस्त्याकडेला लावली होती. काम आटोपून आले असता दुचाकी दिसेना. ट्राफिक क्रेनने दुचाकी नेल्याचा समज करून ते दोन तास प्रतीक्षा करत बसले. तिकडून परत टाऊन हॉलसमोर आले; पण दुचाकी नव्हतीच. यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे गाठले. काही वेळात ही दुचाकी घेऊन काही तरुण पोलिस ठाण्यासमोर आले. दादा माफ करा, नजरचुकीने आमच्या मित्राने दुचाकी नेली होती असे सांगितले; पण प्रत्यक्षात दुचाकी चोरी प्रकरण पोलिस ठाण्याबाहेरच मिटत असल्याचे पाहून दुचाकीमालकही मूग गिळून राहिला. दुचाकी सहीसलामत मिळाल्याने तक्रार न करताच तो घराकडे मार्गस्थ झाला.

Back to top button