गूळ सौदे बंदने शेतकर्‍यांना अडीच कोटींचा फटका | पुढारी

गूळ सौदे बंदने शेतकर्‍यांना अडीच कोटींचा फटका

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  गूळ सौदे बंद पडल्यानंतर दरात 100 ते 200 रुपयांची घसरण होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या हंगामात आतापर्यंत तीन वेळा सौदे बंद पडले. या तिन्ही वेळी दरात घसरण झाल्यामुळे गूळ उत्पादक शेतकर्‍यांना सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. अगोरदच मिळणारा दर आणि उत्पादनासाठी होणारा खर्च याचा ताळमेळ घालत असताना शेतकर्‍यांना गूळ उत्पादन घेणे परवडेनासे झाले आहे. त्यातही काही शेतकरी निष्ठेने आणि पूर्वापार व्यवसाय म्हणून या गूळ उत्पादनाकडे पाहत आहेत. त्यात सौदे बंदच्या फटक्याने शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोेबर महिन्यात पाऊस सुरू होता. त्यामुळे गुर्‍हाळे सुरु होण्यास विलंब झाला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुर्‍हाळे सुरू झाली. गतवर्षी 351 गुर्‍हाळे सुरु झाली होती. त्यात यावर्षी घट झाली. सध्या सुमारे 200 गुर्‍हाळे सुरू आहेत.

करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, कागल, भुदरगड, राधानगरी या तालुक्यात गुर्‍हाळे आहेत. यातील सर्वात जास्त करवीर तालुक्यात गुर्‍हाळे होती; पण दरातील फरकामुळे करवीर तालुक्यातील गुर्‍हाळांची संख्या घटली आहे. गूळ हंगाम सुरू झाल्यानंतर पहिले आठ ते दहा दिवस सौदे सुरळीत सुरू होते. उच्च प्रतीच्या गुळाला 4200 ते 4500 रुपये क्विंटल असा दर होता. दुय्यम प्रतीच्या गुळास सरासरी 3500 ते 3700 रुपये असा दर होता. त्याच दरम्यान साखर कारखान्यांनी 3000 ते 3200 रुपये पहिली उचल देण्यात येईल, असे जाहीर केले. याचा परिणामही गुळासाठी शेतकर्‍यांकडून ऊस येण्यावर झाला. कारण, गुळाच्या उत्पादनाचा खर्च हा टनाला 3200 रुपयांपर्यंत येतो, तर सौद्यामध्ये सरासरी 3500 रुपये दर मिळतो. उत्पादन खर्च आणि मिळणार्‍या दरात 200 रुपयांपर्यंत शेतकर्‍यांच्या हातात पडतात. यामुळे गूळ उत्पादन करणे परवडत नाही, तरीही शेतकरी हे उत्पादन घेत आहेत.

अशा स्थितीत वारंवार गूळ सौदे बंद पडल्याचे प्रकार घडत आहेत. मागील दोन्ही बंदच्यावेळी गुळाच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकर्‍यांना गूळ उत्पादन घ्यावे की थांबवावे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

  • सौदे बंद पडल्यानंतर दरात क्विंटलला 100 ते 200 रुपयांची घसरण
  • गुळाची आवक- दररोज 10 ते 12 हजार बॉक्स व 24 ते 27 हजार रवे
  • मागील दोन वर्षांच्या तुलनेत गुळाच्या दरात सरासरी 200 रुपयांनी घसरण
  • दोन महिन्यांत 40 कोटींची, तर दररोज 70-80 लाखांची उलाढाल
  • तिसर्‍या क्रमांकाच्या गुळास 3500 ते 3600 रु., तर उच्च प्रतीला 4100 ते 4200 रुपये दर

Back to top button