कोल्हापूर : पर्यटक-भाविकांचा ओघ वाढला | पुढारी

कोल्हापूर : पर्यटक-भाविकांचा ओघ वाढला

कोल्हापूर; सागर यादव : कोरोनाचा कहर कमी झाल्याने प्रशासनानेही निर्बंधांत शिथिलता दिली आहे. यामुळे लॉकडाऊनमुळे अनेक महिने ठप्प असणारे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. यामुळे कोल्हापुरात पर्यटक-भाविकांचा ओघ वाढला आहे. यामुळे गेली वर्षभर बंद पडलेला पर्यटन व्यवसाय हळूहळू सुरू होऊ लागला आहे. यामुळे स्थानिक हॉटेलमध्ये गर्दी वाढू लागली असून स्थानिक वैशिष्ट्ये असणार्‍या वस्तूंची विक्रीही सुरू झाली आहे.

गतवर्षी कोरोनामुळे कोल्हापूर मध्ये सात-आठ महिने सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद होती. कोरोना कमी झाल्याने दोन-चार महिन्यांसाठी पुन्हा मंदिरे खुली झाली; मात्र दरम्यान कोरोनाची दुसरी लाट आल्याने मंदिरे पुन्हा बंद करण्यात आली. यामुळे सात-आठ महिने होऊनही अद्याप मंदिरे दर्शनासाठी खुली झालेली नाहीत. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई व दख्खनचा राजा जोतिबा मंदिरे बंद असल्याने धार्मिक पर्यटनासाठी येणार्‍या भाविकांचा ओघ कमी झाला होता. गेल्या दोन-तीन महिन्यांत निर्बंध शिथिल झाल्याने पर्यटनास सुरुवात झाली आहे. यामुळे कोल्हापुरात येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली आहे. अंबाबाई, जोतिबा व नृसिंहवाडी मंदिरांत मुखदर्शनावर भाविक समाधानी होत आहेत. दर्शनानंतर लोक कोल्हापूरची ऐतिहासिक वैशिष्ट्ये पाहण्यासाठी फिरताना दिसत आहेत. यात जुना व नवा राजवाडा, रंकाळा तलाव, राधानगरी धरण, दाजीपूर अभयारण्य, जिल्ह्यातील गडकोट किल्ले आदींचा समावेश आहे.

अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, जुना राजवाडा, ताराबाई रोड, रंकाळा परिसर, बिंदू चौक परिसरातील पर्यटनाशी निगडीत व्यवसाय पूर्ववत सुरू झाले आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये गर्दी वाढली आहे. खाद्यपदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. कोल्हापूरची वैशिष्ट्ये असणार्‍या गूळ, तिखट, मसाले यासह कोल्हापुरी साज, नथ, कोल्हापूरची चप्पल अशा वस्तूंनाही मागणी वाढली आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने कोल्हापुरात पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. परराज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक कोल्हापुरात दाखल होऊ लागले आहेत. पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. याचा फायदा पर्यटनसंदर्भातील सर्व व्यावसायिकांना होऊ लागला आहे.
– किरणसिंह चव्हाण,
पर्यटन व्यावसायिक

परराज्यांतील पर्यटक कोल्हापुरात येऊ लागल्याने स्थानिक किरकोळ व्यावसायिकांचे ठप्प असणारे व्यवसाय हळूहळू पूर्ववत होऊ लागले आहेत. यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्यानंतर यात वाढच होणार आहे.
– दिपक खांडेकर,
कोल्हापुरी चप्पल व्यावसायिक

Back to top button