कोल्हापूर : महालक्ष्मी, हरिप्रिया एक्स्प्रेसला विद्युत इंजिन | पुढारी

कोल्हापूर : महालक्ष्मी, हरिप्रिया एक्स्प्रेसला विद्युत इंजिन

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर-मुंबई ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ आणि कोल्हापूर-तिरुपती ‘हरिप्रिया एक्स्प्रेस’ मंगळवारपासून विद्युत इंजिनवर धावू लागली आहे. यामुळे रेल्वेची दररोज सुमारे साडेचार हजार लिटर डिझेलची बचत होणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रदूषणातही घट होईल. यासह रेल्वेला दैनंदिन अडीच लाखांचा फायदाही होणार आहे.

कोल्हापूर-मिरज या मार्गाच्या विद्युतीकरणाची 11 डिसेंबर 2019 रोजी चाचणी झाली. अखेरच्या टप्प्यात आदर्की ते सातारा या 37 कि.मी. आणि सातारा ते शेणोली या 68 कि.मी. मार्गाची 9 मार्च 2023ला चाचणी झाली. यामुळे कोल्हापूर-पुणे या 326 कि.मी. लांबीच्या मार्गाचे एका बाजूचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस विद्युत इंजिनवर धावत आहे. त्यापाठोपाठ आता ‘महालक्ष्मी’ आणि ‘हरिप्रिया’ एक्स्प्रेसही नियमितपणे विद्युत इंजिनवर धावू लागल्या आहेत.

प्रवासी रेल्वेगाडीला प्रति किलोमीटरसाठी सुमारे सहा लिटर डिझेल लागते. यामुळे महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्स्प्रेस विद्युत इंजिनवर धावू लागल्याने दररोज लागणार्‍या सुमारे साडेचार हजार लिटर डिझेलची बचत झाली आहे. विजेचा होणारा खर्च आणि डिझेलचा होणारा खर्च याचा विचार करता रेल्वेला विद्युत इंजिनमुळे दररोज अडीच लाख रुपयांचा फायदा होणार आहे. याखेरीज डिझेल इंजिनमुळे निर्माण होणारा धूर हवेत मिसळून होणारे प्रदूषण काही प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकावर नवा प्लॅटफॉर्म उभारला आहे. त्याबरोबर दोन प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

Back to top button