कोल्हापूर : राजाराम बंधार्‍यावरून अवजड वाहतूक सुरूच | पुढारी

कोल्हापूर : राजाराम बंधार्‍यावरून अवजड वाहतूक सुरूच

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : कसबा बावडा येथील ऐतिहासिक राजाराम बंधार्‍याच्या संवर्धनासाठी दोन्ही बाजूला लोखंडी गर्डलच्या कमान करण्यात आल्या होत्या. बंधार्‍यावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती, पण गतसाली लोखंडी कमानी तुटल्यामुळे बंधार्‍यावरून उसाच्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. बंधार्‍याची सुरक्षा आणि संवर्धनाची काळजी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी 22 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याला दोन वर्षे लोटली, पण अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. बंधार्‍यावरून सुरू असलेल्या वाहतुकीने सततच्या वाहतुकीमुळे बंधार्‍याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. दीड महिन्यापूर्वी बैलगाडीचा बैल बुजल्याने नदीपात्रात कोसळला. काही तरुणांनी प्रसंगावधान दाखवत पाण्यात उडी घेतल्याने, त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. बंधार्‍यावरची वर्दळ वाढली आहे, त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. समांतर पुलाचे काम गेली दोन वर्षे पूर्णतः बंद आहे.

बंधार्‍याच्या दुरुस्तीचे काम राजाराम कारखाना गत गळीत हंगामानंतर फेब—ुवारी महिन्यात सुरू करण्यात येणार होते, अशी सूचना तत्कालीन पालकमंत्री यांनी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना दिल्या होत्या. पुढचा गळीत हंगाम सुरू झाला तरीही दुरुस्तीचा श्रीगणेशा झाला नाही. 22 लाखांच्या निधीतून राजाराम बंधार्‍याच्या दोन्ही बाजूस असलेल्या संरक्षक स्तंभांची दुरुस्ती, बंधार्‍याचे उर्ध्व बाजूस लोह बीम टाकणे, संपूर्ण बंधार्‍यावर लोहसळीसह स्लॅब टाकणे आदी कामे होणार आहेत.

Back to top button