कोल्हापूर : दोनदा मदत घेतलेल्या कोरोना मृतांच्या नातेवाईकांकडून वसुलीचा आदेश | पुढारी

कोल्हापूर : दोनदा मदत घेतलेल्या कोरोना मृतांच्या नातेवाईकांकडून वसुलीचा आदेश

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये मदती देण्याचा निर्णय शासनाने घेतला; पण 60 जणांच्या खात्यांवर ही मदत दोनदा वर्ग झाली आहे. या रकमेची परत वसुली करणे ही जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी बनली आहे. 60 पैकी 20 हून अधिक कुटुंबीयांनी वसुलीचा फोन जाण्याआधी स्वतःहून प्रामाणिकपणे रक्कम परत केली आहे. 20 जणांना प्रशासनाने फोन केल्यानंतर तजवीज करून रक्कम भरली. उर्वरित लोकांनी पैसे भरू, असे सांगितले आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना शासनाच्या वतीने 50 हजारांचे अर्थसाहाय्य दिले जात आहे. जिल्ह्यातील 7 हजारांवर वारस पात्र ठरले आहेत. त्यांच्या अर्जांची व कागदपत्रांची छाननी करून खात्यावर रक्कम वर्ग केली जात आहे. डेटा तपासणी केल्यानंतर प्रशासनाच्या असे लक्षात आले की, 60 व्यक्तींच्या खात्यांवर दोनदा पैसे वर्ग झाले आहेत. राज्य शासनातील अधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासनाला दुसर्‍यांदा जमा झालेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button