राज्यभर युवा महोत्सवाची धूम | पुढारी

राज्यभर युवा महोत्सवाची धूम

कोल्हापूर; आशिष शिंदे :  राज्यातील युवकांना कलागुण दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी राज्यभर 44 वा युवा महोत्सव होणार आहे. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर अशा त्रिस्तरीय महोत्सवातून राज्याला नवे कलाकारही मिळतील. या युवा महोत्सवाला स्थानिक पातळीवरील युवा नेतेही व्यासपीठ गाजवतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारे हे युवकांचे संघटन राजकीय पक्षांनादेखील फायद्याचे ठरणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात असा महोत्सव आयोजित करण्याची प्राथमिक तयारी सुरू आहे. राज्यभरातील 35 जिल्ह्यांमध्ये होणार्‍या या महोत्सवासाठी प्रत्येक जिल्ह्याला 75 हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याचे आठ महसूल विभाग असून या विभागीय स्तरावर प्रत्येकी एक महोत्सव होणार आहे. त्या प्रत्येक महोत्सवासाठी 1 लाख 25 हजार, तर राज्य स्तरावर होणार्‍या महोत्सवाला 13 लाख 75 हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

2022-23 या आर्थिक वर्षासाठी युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी 25 कोटींचा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला असून यातून 50 लाख वितरित करण्यात आले आहेत. या महोत्सवात निवड झालेल्या राज्याच्या प्रतिनिधी संघास राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विभागीय उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी व आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

महाराष्ट्रातील कला संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्यांचा कलांचा समावेश करण्यात येणार आहे. कोल्हापुरातही जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठीची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच स्पर्धकांसाठी महोत्सवाची तारीख जाहीर करण्यात येईल.
– चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी

Back to top button