

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सीमावासीयांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहण्याची गरज असून, मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र-कर्नाटक राज्यपालांच्या बैठकीतील माहिती सभागृहाला आणि महाराष्ट्रातील जनतेला द्यावी, अशी मागणी आ. सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत गेल्या 50 वर्षांत कधीही देान्ही राज्यांच्या राज्यपालांची बैठक झाली नाही. 4 नोव्हेंबर रोजी बैठक प्रथमच झाली. बैठकीस सीमाभागातील जिल्ह्यांचे सर्व जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहातील सदस्यांना व महाराष्ट्रातील जनतेला द्यावी, असे पाटील म्हणाले.
देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सीमाभागातील लोकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी, आंदोलनाकरिता कर्नाटक सरकार परवानगी देत नसल्यामुळे त्यांना कर्नाटकातून आंदोलनासाठीकोल्हापुरात यावे लागते, ही लोकशाहीत दुर्दैवी बाब आहे.
सीमावासीय नेहमीच महाराष्ट्राकडे वडीलकीच्या नात्याने आणि आधाराच्या भूमिकेने पाहत आले आहेत. त्यामुळे आपण सीमावासीयांच्या पाठीशी आहोत हे फक्त भाषणातून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सीमालढ्यात सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे. आजवरचा अनुभव पाहता सीमाप्रश्नाची संपूर्ण जबाबदारी एका मंत्र्याकडे सोपवावी, असेही आ. पाटील यांनी सांगितले.