कोल्हापूर : गोशाळेतील खोंडाचा बिबट्याने पाडला फडशा | पुढारी

कोल्हापूर : गोशाळेतील खोंडाचा बिबट्याने पाडला फडशा

टोप, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील तासगाव येथील सिद्धोबाच्या डोंगरावर बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे. गुरुवारी डोंगरावरच्या गोशाळेतील एका खोंडावर हल्ला करून बिबट्याने ठार केले. दरम्यान, परिसरात लावलेल्या कॅमेर्‍यामध्ये बिबट्या कैद झाला असून सापळा लावून बिबट्याला पकडण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तासगाव डोंगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती.

परिसरातील भटक्या कुत्र्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडत होत्या. तासगावमधील डॉ. विजय पाटील व गोशाळेच्या कर्मचार्‍यांनी वन विभागाशी संपर्क केला होता. वन विभागाकडील कर्मचार्‍यांनी पाहणी केली होती. तथापि बिबट्या की तरस याबाबत संभ—म होता. तथापि दोन दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी रात्री खिंड या नावाने ओळखल्या जाणार्‍या डोंगराच्या नजीक असलेल्या वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या संजीवनी गोशाळेतील दोन वर्षाच्या खोंडावर हल्ला करून बिबट्याने त्याला उचलून नेऊन त्याला ठार मारले आहे.

या वासरावरील हल्ल्यावेळी। इतर गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकून कर्मचार्‍यांनी बॅटर्‍यांचा उजेड व आरडाओरडा केल्याने बिबट्याने पलायन केल्याचे गोशाळेचे कर्मचारी महेश पाटील यांनी सांगितले. गोशाळेच्या 100 वर गायी असून गायींच्या देखभालीसाठी त्यांचे कर्मचारी तेथे वास्तव्यास असतात काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुत्र्यास देखील बिबट्याने ठार केले होते

दरम्यान या घटनेनंतर वन विभागाकडील वनरक्षक तसेच रेस्क्यू टीमने घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. मृत वासराचा पंचनामा केला आहे. दरम्यान, परिसरातील पाऊलखुणा व बिबट्याने वासरू मारलेल्या ठिकाणी वन विभागाकडील रेस्क्यू टीमने लावलेल्या कॅमेर्‍यांमध्ये बिबट्या कैद झाला असून हा पूर्ण वाढ झालेला बिबट्या असल्याचे दिसून आले आहे. तासगाव, मिणचे, कापूरवाडी परिसरातील गुराखी, मेंढपाळ डोंगरावर गुरे, मेंढरे चरण्यासाठी येत असून त्यांच्यात घबराट पसरली असून वनविभागाने तात्काळ सापळे लावून या बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Back to top button