कोल्हापूर : ‘राज्य उत्पादन शुल्क’ची तस्करी रोखण्यात भरारी | पुढारी

कोल्हापूर : ‘राज्य उत्पादन शुल्क’ची तस्करी रोखण्यात भरारी

कोल्हापूर, गौरव डोंगरे : कोंबड्या वाहतुकीच्या वाहनात छुपे कप्पे…. टेम्पोच्या टपाखाली चोरटा पोटमाळा…. मेडिकल साहित्याच्या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या… मोटारीच्या डिक्कीतील फेरबदल असे कित्येक फंडे दारू तस्करांकडून सुरू आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सीमाभागात अशी संशयास्पद 21 वाहने वर्षभरात पकडून 244 संशयितांना अटक केली. या तस्करांकडून 1 कोटी 88 लाखांच्या दारूसह पावणेतीन कोटींचा मुद्देमाल या भरारी पथकाने जप्त केला आहे.

राज्याच्या महसुलात भर टाकणार्‍या मद्यावर गोवामेड दारूचा मोठा परिणाम होतो. दरवर्षी गोवा राज्यातून मोठ्याप्रमाणात दररूची तस्करी केली जात असल्याचे दिसून येते. राजस्थान, मध्य प्रदेशात जाणारे अनेक ट्रक, टेम्पोही कोल्हापुरातून पुढे जात असतात. अशा वाहनांमध्ये अनेक बदल करून पोलिसांना चकवा देण्याचा खटाटोप तस्कारांकडून सुरू असल्याचे वर्षभरात उजेडात आले आहे.

कंटेनरच्या छताखालीच छुप्या पद्धतीने कप्पा बनवून त्यामध्ये मद्याचे बॉक्स ठेवले जातात. कोंबड्यांची वाहतूक करणारे अनेकजण दररोज महाराष्ट्र-गोवा असा प्रवास करतात. याचाही फायदा घेत काही मद्य तस्करांनी कोंबड्यांच्या पिंजर्‍याच्या मध्यभागी काही छुपे कप्पे बनवल्याचे भरारी पथकाने पकडले. कंटेनर सिल करून औषधाचे बिल दाखविणार्‍या एका संशयितालाही या भरारी पथकाकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत विभागीय भरारी पथकाने 356 गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये 238 वारस, तर 118 बेवारस कारवाया आहेत. यामध्ये 244 संशयितांना अटक करून 21 वाहने जप्त करण्यात आली आहेत. याद्वारे 1 कोटी 88 लाख 44 हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे.

विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी, निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या भरारी पथकाने ही कामगिरी बजावली आहे.

Back to top button