कोल्हापुरात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारी शाळा | पुढारी

कोल्हापुरात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारी शाळा

कोल्हापूर, डॅनियल काळे : कोल्हापूर चर्च कौन्सिलची एस्तेर पॅटन गर्ल्स हायस्कूल ही कोल्हापुरातील पहिली मुलींची शाळा 150 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. तत्कालीन तिसरे शिवाजी ऊर्फ बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी आऊबाई व बाळाबाई यांच्या सहाय्याने ही शाळा उभारली. सुरुवातीला राजवाड्यात भरणारी ही शाळा काही कालावधीने स्वतंत्र विस्तीर्ण जागेत सुरू झाली. या शाळेत राजघराण्याबरोबरच सामान्य घरातीलही अनेक मुलींनी शिक्षण घेतले. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी याच शाळेच्या विद्यार्थिनी आहेत.

कोल्हापुरात स्त्री शिक्षणाचा पाया घालणारी शाळा म्हणून या शाळेचे योगदान मोठे आहे. सरकारी रेकॉर्डप्रमाणे 1873 ला सुरू झालेली ही शाळा आता 150 व्या वर्षात पदार्पण करत आहे. आजदेखील ही शाळा चांगल्या पद्धतीने सुरु आहे. बाबासाहेब महाराज आणि त्यापुढच्या काळात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी या शाळेला सर्वतोपरी मदत केली.

1850 च्या सुमाराचा तो काळ शिक्षणासाठी आणि त्यातल्या त्यात महिलांच्या शिक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल होता. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या पाठोपाठ काही वर्षांतच कोल्हापुरातही मुलींसाठी शाळा सुरू करण्यात आली. 1852 च्या सुमारास कोल्हापूर रेव्ह. रॉयल गोल्ड वायल्डर व त्यांच्या पत्नी हे अमेरिकन मिशनरी दाम्पत्य कोल्हापूरला आले. त्यांनी जुन्या राजवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली.

रेव्ह. वायल्डर यांच्या पत्नी त्या वेळी या आऊबाई व बाळाबाई या दोघींना शिकवत होत्या. काही वर्षांनी एस्तेर पॅटन ही 22 वर्षांची अमेरिकन तरुणी कोल्हापुरात आली. त्यांनी येथील स्त्रिया अशिक्षित असल्याचे पाहिले आणि त्यावेळी त्यांनी मिसेस वायल्डर यांच्या सहाय्याने मराठी भाषा अवगत करून छोट्याशा झोपडीत शिक्षणाचे कार्य सुरू केले. शाळेबरोबर काही मुलींच्या राहण्याचीही व्यवस्था वसतिगृहात केली. सध्यादेखील या शाळेत मुलींचे स्वतंत्र वसतिगृह आहे.

आनंदीबाई जोशी या शाळेच्या विद्यार्थिनी असल्याचा उल्लेख काही पुस्तकात आहे. आनंदीबाईंनी अमेरिकेत जाऊन एमडीची पदवी घेतली. त्या भारतात आल्यानंतर कोल्हापुरात अल्बर्ड एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री कक्षाचा कार्यभार त्यांना देण्यात आला. वयाच्या 20 व्या वर्षीच त्यांना क्षयरोग झाला. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला; पण प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन सेवा केली.

Back to top button