कोल्हापूर : अलोट गर्दीच्या साक्षीने ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ची सांगता | पुढारी

कोल्हापूर : अलोट गर्दीच्या साक्षीने ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ची सांगता

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : फॅशनेबल कपडे, ज्वेलरी, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅक्सेसरीजची रेलचेल यासोबत खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकरांनी आयर्विन ख्रिश्चन मैदानावर गर्दी केली होती. निमित्त होते दै. ‘पुढारी’ आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचे. ‘शेतकरीच नवरा हवा’ फेम सयाजी (प्रदीप घुले), रेवा (ऋचा गायकवाड ) या दोघांनी फेस्टिव्हलच्या प्रेक्षकांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. कोल्हापूरकरांच्या अलोट गर्दीच्या साक्षीने फेस्टिव्हलची मंगळवारी सांगता झाली. प्रदर्शनासाठी सहप्रयोजक रॉनिक स्मार्ट वॉटर हिटर, मीडिया पार्टनर कलर्स मराठी वाहिनी तर आईस्क्रीम पार्टनर क्रेझी आईस्क्रीम यांचे सहकार्य लाभले.

दै.‘पुढारी’, टोमॅटो एफ. एम., कस्तुरी क्लबतर्फे पाच दिवसांपासून शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. बचत गट, लघू उद्योजकांपासून विविध कंपन्यांची वाहने, वेगवेगळ्या ब्रँडस्च्या वस्तू फेस्टिव्हलमध्ये मांडण्यात आल्या होत्या. दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅक्सेसरीज, नवनव्या ट्रेंडचे कपडे, ज्वेलरी, आयुर्वेद, पंचकर्म,फॅशनेबल चप्पल, शूज, पडदे, साड्या, फॅशन आणि लाईफ स्टाईल पाहण्यासाठी व खरेदीला झुंबड उडाली होती.

‘एव्हरग्रीन मेलडीज’ कार्यक्रम अमर इस्लामपुरे यांच्या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ‘शेतकरीच नवरा हवा’ फेम सयाजी (प्रदीप घुले), रेवा (ऋचा गायकवाड) यांचे मंचावर आगमन झाले. दोघांनीही प्रेक्षकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. कलर्स मराठीवरील त्यांच्या नव्या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्येही मोठी उत्सुकता यानिमित्ताने दिसून आली. अभिनेत्री ऋचा गायकवाड हिने प्रेक्षकांच्या विनंतीवरून ‘चंद्रा’ या गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. रात्री उशिरापर्यंत फेस्टिव्हलला गर्दी होती.

Back to top button