कोल्हापूर : फुटबॉल हंगामाचा प्रारंभच हाणामारीने | पुढारी

कोल्हापूर : फुटबॉल हंगामाचा प्रारंभच हाणामारीने

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यातील सामन्यावेळी खेळाडू मैदानात तर दोन्ही संघांचे समर्थक प्रेक्षक गॅलरीत एकमेकांना भिडले. प्रचंड पोलिस बंदोबस्ताची पर्वा न करता आणि खिलाडू वृत्तीने खेळ करण्याच्या आवाहनाला न जुमानता खेळाडू व समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. इतकेच नव्हे तर काही हुल्लडबाजांनी फ्री स्टाईल हाणामारीही केली. पोलिसांनी लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, दोन्ही संघांच्या प्रत्येकी एका खेळाडूवर पंचांनी रेडकार्डची कारवाई केली.

शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेने मंगळवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर यंदाच्या फुटबॉल हंगामास सुरुवात झाली. दुपारच्या पहिल्या सामन्यात फुलेवाडी मंडळाने संध्यामठ तरुण मंडळाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. यानंतर सायंकाळी 4 वाजता दिमाखदार सोहळ्याने स्पर्धेचे उद्घाटन झाले. शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम यांच्यातील सामन्याच्या उत्तरार्धात शिवाजी मंडळने 2-0 अशी आघाडी मिळविल्यानंतर प्रेक्षक गॅलरीत प्रचंड जल्लोष झाला. यामुळे दोन्हीकडील समर्थकांच्यात प्रचंड ईर्ष्या निर्माण झाल्याने एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. पोलिसांनी लाठीमार करून दोन्हीकडील समर्थकांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंमध्येही एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. दोन्ही संघांचे खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक एकमेकांच्या अंगावर गेले. पंचांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे बराच वेळ सामना थांबवावा लागला. अखेर या प्रकारास कारणीभूत असणार्‍या दिग्विजय आसनेकर (खंडोबा) व किमरण फर्नांडिस (शिवाजी मंडळ) या दोघांवरही मुख्य पंच अजिंक्य गुजर यांनी रेडकार्ड दाखवून सामन्याबाहेर काढण्याची कारवाई केली. यानंतर सामना सुरळीत पार पडला. यात शिवाजी मंडळने 3-1 विजय मिळविला.

Back to top button