कोल्हापूर : कोरोची ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा? | पुढारी

कोल्हापूर : कोरोची ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा?

कबनूर, सुरेश कुंभार : हातकणंगले तालुक्यातील कोरोची ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आलेले अपक्ष उमेदवार डॉ. संतोष भोरे बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याने ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उपसरपंच निवडीवेळी याचा उलगडा होईल. असे घडले, तर ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच शिंदे गटाची सत्ता येईल.

डॉ. भोरे हे भाजपचे कट्टर समर्थक होते. ते भाजपकडून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. कोरोची सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली. तथापि, भाजपने डॉ. देवानंद कांबळे यांना उमेदवारी दिल्याने डॉ. भोरे यानी बंड केले. गावाने त्यांना डोक्यावर घेत निवडून दिले. डॉ. भोरे यांनी अद्याप भाजपशी सोडचिठ्ठी घेतली नाही; मात्र ते आता भाजपात राहणार की अन्य पक्षात प्रवेश करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने व त्यांच्या टीमने डॉ. भोरे यांचा सत्कार केला. शिंदे गटाने सत्कार केला म्हणून मी त्या पक्षाचा उमेदवार झालेलो नाही, असे सांगत त्यांनी निवडणुकीत पाठिंबा दर्शविला होता, हे डॉ. भोरे यांनी कबूल केले. मी कोणत्या पक्षात जायचे, हे गावच ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

डॉ. भोरे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत गावाच्या विकासासाठी 2 कोटी रुपये निधीची मागणी केली. डॉ. भोरे यांचा शिंदे गटातील प्रवेश निश्चित मानला जात आहे; मात्र डॉ. भोरे यांच्या निर्णयाकडे गावाचे लक्ष लागले आहे. भाजप व आवाडे युती न रुचल्याने गावाने स्थानिक व अपक्ष उमेदवार म्हणून डॉ. भोरेंना निवडून दिल्याची चर्चा गावात आहे. राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार आहे. डॉ. भोरे शिंदे गटात गेले, तर ते पुन्हा भाजपच्याच वळचणीला गेल्यासारखे होणार असल्याची चर्चा आहे.

कोरोचीवर कोणाचे वर्चस्व राहणार?

शासनाकडून वित्त आयोग व इतर निधी मिळून कोट्यवधींचा निधी मिळतो. कररूपात मिळणारे उत्पन्न व ठोक अंशदानाचा विचार करता योग्य नियोजन केल्यास गावाच्या विकासासाठी हात पसरण्याची वेळ येणार नाही. निधीसाठी एखाद्या पक्षाला पायघड्या घालणे व पक्ष प्रवेश करणे म्हणजे गावावर त्या पक्षाचे वर्चस्व लादल्यासारखे होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Back to top button