कोल्हापूर, प्रवीण मस्के : सुसंस्कार शिक्षण मंडळ संचलित माझी शाळा प्राथमिक विभागातील शिक्षक संजय सुतार यांच्यावर वर्गात विद्यार्थ्यास अंगठे धरण्याची शिक्षा दिल्याने प्राणघातक हल्ला झाला. या घटनेमुळे शाळा परिसरात मंगळवारी दिवसभर शुकशुकाट होता. घटनेची माहिती सांगताना प्रत्यक्षदर्शी शिक्षकांना अश्रू अनावर झाले. यानिमित्ताने विद्यार्थी, शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कदमवाडी परिसरात माझी शाळा आहे. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास काही विद्यार्थी शिक्षक सुतार हे वर्गात शिकवत असताना त्यांना कोणीतरी खाली बोलावले म्हणून सांगत आले. त्यावेळी सुतार खाली शाळेच्या मागील बाजूस त्यांची दुचाकी वाहन उचलण्यास गेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यावेळेस हल्लेखोर पसार झाले.
अचानक घडलेल्या घटनेने शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक धावत बाहेर आले. यावेळी विद्यार्थी भेदरलेल्या अवस्थेत होते. तत्काळ शाळेस सुट्टी देण्यात आली. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी दिवसभर शाळेत शिक्षक, शिक्षिका बसून होत्या. प्रत्येकाच्या चेहर्यावर भीतीची छाया पाहायला मिळाली. शिक्षक सागर पाटील यांना घटनाक्रम सांगताना भावना अनावर झाल्या. घटनेची माहिती समजताच परिसरातील माजी विद्यार्थी, नागरिकांनी घटनेचा जाहीर निषेध केला. शाळेत धाव घेऊन पाठिशी असल्याचे शाळा प्रशासनास सांगितले. महिला शिक्षीका व परिसरातील नागरिकांनी शाळेच्या परिसरात शिक्षकांवर हल्ले होत असतील तर शिकवणे अवघड होईल. शिक्षकांसाठी सरकारने ठोस कायदे करावेत. अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षा कशी मिळणार असे प्रश्न उपस्थित केले.
प्रसंगावधानामुळेच शिक्षकाचे प्राण वाचले
शाळा पसिरात असलेल्या गॅरेजवर रिक्षाचालक महेश हळदीकर कामासाठी आल होते. शिक्षकावर हल्ला झाल्याचे समजताच ते घटनास्थळी धावून गेले. प्रसंगावधान दाखवित रिक्षाचालक व शिक्षकांनी जखमी शिक्षक सुतार यांना रिक्षात घालून खासगी दवाखान्यात नेले. त्यामुळेच शिक्षकाचे प्राण वाचले.